मुंबई : गेल्या चार दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी मध्यरात्रीपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली. मुंबई शहरासह उपनगरांमध्ये झालेल्या दमदार सरींमुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. अंधेरी, साकीनाका, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी), मुलुंड, बोरिवली, कांदिवलीसह अनेक भागांत रात्रीपासून चांगला पाऊस झाला. मंगळवारी सकाळीही शहरात ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी हलक्या सरी सुरू होत्या.
भारतीय हवामान विभागाने मुंबई, कोकण आणि राज्यातील अनेक भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर विदर्भातील अमरावती जिल्ह्यासाठी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील २४ तास राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार असून अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई आणि कोकणासह राज्यातील विविध भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील लोणावळा येथे गेल्या २४ तासांत राज्यातील सर्वाधिक ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच पुणे जिल्ह्यातील घाटमाथा, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असला तरी त्यानंतर मॉन्सूनची पुढील वाटचाल काहीशी मंदावली होती. मात्र, पुढील दोन ते तीन दिवसांत गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार तसेच उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागांत मॉन्सून पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यातही येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.


