आरोग्य यंत्रणेतील रिक्त पदे तातडीने भरा : आ. श्रीजया चव्हाण यांची मागणी

नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेतील सर्व रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी सोमवारी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची राज्यव्यापी आरोग्य संवाद यात्रा सुरू असून, नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी सोमवारी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत सहभागी होऊन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण आणि आमदार श्रीजया चव्हाण यांनी आरोग्य विभागाशी संबंधित विविध प्रश्नांकडे आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

यावेळी आमदार श्रीजया चव्हाण यांनी भोकर विधानसभा मतदारसंघातील भोकर, मुदखेड आणि अर्धापूर या तालुक्यांमधील आरोग्यविषयक समस्या मांडल्या. त्या म्हणाल्या की, सध्या सोनोग्राफी मशीनचा वापर प्रामुख्याने गर्भवती महिलांसाठीच मर्यादित राहिला आहे. मात्र, इतरही अनेक आजारांच्या अचूक निदानासाठी ही चाचणी आवश्यक असल्याने इतर गरजू रुग्णांनाही ही सुविधा उपलब्ध करून द्यावी. याशिवाय, डायलिसिस केंद्रासाठी नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करणे, रुग्णालयांच्या नियमित साफसफाईसाठी कंत्राटदार नियुक्त करणे, जैववैद्यकीय कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी दाहक यंत्र (इन्सिनरेटर) उपलब्ध करून देणे आणि येळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तातडीने निधी मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली.

माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनीही या बैठकीत महत्त्वाचे विषय उपस्थित केले. विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला ‘सुपर स्पेशालिटी’चा दर्जा देण्याचा प्रस्ताव राज्य शासनामार्फत केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला असून, त्यासाठी राज्य शासनाने ठोस पाठपुरावा करावा, असे ते म्हणाले. यासोबतच भोकर येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक निधी देऊन प्रलंबित काम लवकरात लवकर पूर्ण करणे, भोकर येथील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्रस्तावाला मंजुरी देणे आणि सर्वच उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये तसेच आरोग्य केंद्रांमध्ये पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्याच्या मागण्याही त्यांनी यावेळी केल्या.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

हॉकी संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी स. गुरमीतसिंघ नवाब यांचा सत्कार

नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य हॉकी इंडिया संघटनेच्या उपाध्यक्षपदी नगरसेवक सरदार गुरमीतसिंघ बाबूसिंघ नवाब (डिंपल) यांची निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ भाजपा नेते अरविंद भारतीया तसेच खालसा क्लबच्या माजी खेळाडूंच्या वतीने…

शृंग-गिरि विद्यारण्य वेदपाठशाळेची नाशिकमध्ये स्थापना

नाशिक : शुक्ल यजुर्वेदाच्या अध्ययनासाठी देशात प्रसिद्ध असलेल्या नाशिकमध्ये आता ‘शृंग-गिरि विद्यारण्य वेदपाठशाळे’ची स्थापना करण्यात येणार आहे. दक्षिणाम्नाय श्री शृंगेरी शारदापीठाधीश्वर शंकराचार्य श्री विधुशेखर भारती यांनी याबाबत घोषणा केली. या…