नाशिक : शुक्ल यजुर्वेदाच्या अध्ययनासाठी देशात प्रसिद्ध असलेल्या नाशिकमध्ये आता ‘शृंग-गिरि विद्यारण्य वेदपाठशाळे’ची स्थापना करण्यात येणार आहे. दक्षिणाम्नाय श्री शृंगेरी शारदापीठाधीश्वर शंकराचार्य श्री विधुशेखर भारती यांनी याबाबत घोषणा केली. या पाठशाळेत प्रारंभी षडंग व दशग्रंथांसह ऋग्वेदाच्या अध्ययनाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या घोषणेची माहिती देताना नाशिकच्या वैदिक ज्ञान विज्ञान संस्कृत महाविद्यालय वेदपाठशाळेचे प्राचार्य स्मार्तचूडामणि पं. शांतारामशास्त्री भानोसे यांनी सांगितले की, नाशिकमध्ये ऋग्वेदाचे अध्ययन करणाऱ्यांची संख्या कमी आहे. ती वाढविण्यासोबतच भविष्यात अथर्ववेद आणि सामवेदाच्या अध्ययनाची व्यवस्था करण्यासाठी स्वतंत्र ‘वेदभवन’ उभारण्यात येणार आहे. नाशिकमध्ये चारही वेदांचे पीठ असावे, अशी इच्छा शृंगेरीचे शंकराचार्य भारती तीर्थ यांनी १९ वर्षांपूर्वी व्यक्त केली होती.
वेदपाठशाळा आणि शृंगेरी मठात आयोजित समारंभात शंकराचार्यांनी ब्रह्मवृंद, विद्वतजन आणि विविध समुदायांशी संवाद साधताना अनेक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले. यामध्ये वेदपाठशाळेच्या स्थापनेबरोबरच नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील वंशपरंपरागत तीर्थपुरोहितांसाठी ‘विशेष पौरोहित्य पाठ्यक्रम’ तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
या उपक्रमासाठी दक्षिणाम्नाय शृंगेरी पीठातर्फे अनुदान आणि प्रोत्साहन दिले जाणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करून प्रमाणपत्र प्राप्त करणाऱ्या पुरोहितांनाच या तीर्थक्षेत्री पौरोहित्य करण्याचा अधिकार असेल, असे शंकराचार्यांनी स्पष्ट केले. या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्याची जबाबदारी पं. भानोसे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
या अभ्यासक्रमात गंगापूजन, दशविध स्नान, क्षौर संकल्प, प्रायश्चित्त विधान, विष्णुपूजन, तीर्थश्राद्ध, अभिषेक, तीर्थसंबंधित देवतांचे स्मरण, तीर्थ पंचक्रोशी यात्रा आणि त्रिस्थळी यात्रा यांसारख्या महत्त्वाच्या धार्मिक विधींचा समावेश असेल. धर्मकार्य अधिक व्यापक आणि सुसंघटित व्हावे, या उद्देशाने कार्यरत संघटनांना शृंगेरी पीठ सहकार्य करेल, असे आश्वासनही शंकराचार्यांनी दिले. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर हे शृंगेरीच्या धर्मक्षेत्रात येत असल्याने देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी एकसमान पूजाविधी असावा, यासाठी अशा अभ्यासक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.


