नांदेड (विशेष प्रतिनिधी) : सचखंड श्री हजूर साहिब, नांदेड येथे येत्या ७ नोव्हेंबरपासून दीपोत्सवाला प्रारंभ होणार असून, १५ नोव्हेंबर रोजी नगर कीर्तनाने या उत्सवाची सांगता होणार आहे. सचखंड गुरुद्वारा येथे साजऱ्या होणाऱ्या प्रमुख उत्सवांपैकी दीपमाळा, बंदीछोड दिन आणि गुरु-ता-गद्दी श्री गुरु ग्रंथ साहिब हे महत्त्वाचे उत्सव आहेत. या उत्सवाचा प्रारंभ शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी ऐतिहासिक तक्त स्नानाने होणार आहे. यानिमित्त गोदावरी नदीतून आणलेल्या पाण्याने संपूर्ण गुरुद्वारा स्वच्छ करण्यात येतो. तसेच ऐतिहासिक शस्त्रांची सेवा करून ती भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येतात.
रविवार, ८ नोव्हेंबर रोजी दिवाळी असून हा दिवस बंदीछोड दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सायंकाळी दिव्यांच्या रोषणाईने संपूर्ण परिसर सजवण्यात येईल. तसेच विविध शस्त्रांचे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे. सायंकाळी ४ वाजता महल्लाला प्रारंभ होईल. यात गुरु साहेबांचे घोडे, निशाण साहिब, कीर्तनी जत्थे, भजनी मंडळ आणि गतका पथक सहभागी होतील. हा महल्ला गुरुद्वारा गेटमार्गे महावीर स्तंभ येथे पोहोचेल. या ठिकाणी रोमहर्षक हल्लाबोल सादर करण्यात येईल.
बुधवार, ११ नोव्हेंबर रोजी श्री गुरु ग्रंथ साहिबजींचा गुरु-ता-गद्दी दिवस साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त नगीना घाट येथून भव्य मिरवणूक काढण्यात येईल. सचखंड येथे पंचप्यारे साहिबांच्या उपस्थितीत गुरु-ता-गद्दीचा कार्यक्रम संपन्न होईल. गुरु-ता-गद्दीनिमित्त श्री गुरु ग्रंथ साहिब भवन येथे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी होणाऱ्या या कार्यक्रमात देशभरातील नामवंत रागी जत्थे आणि कलाकार सहभागी होणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या समागमाचा समारोप १५ नोव्हेंबर रोजी नगर कीर्तनाने होणार आहे. यानिमित्त सायंकाळी ४ वाजता श्री गुरु ग्रंथ साहिबजींच्या हजेरीत नगर कीर्तन काढण्यात येईल. शहरातून मार्गक्रमण केल्यानंतर या नगर कीर्तनाची सचखंड येथे सांगता होईल. ७ ते १५ नोव्हेंबरदरम्यान आयोजित या दीपोत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन गुरुद्वारा बोर्डातर्फे करण्यात आले आहे.


