अमरावती,राज माहोरे (प्रतिनिधी) : दुष्काळामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांतील मुला-मुलींचे विवाह सन्मानपूर्वक पार पडावेत, या सामाजिक हेतूने स्व. सूर्यकांतादेवी रामचंद्रजी पोटे पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २८ फेब्रुवारी २०२७ रोजी पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप, अमरावती येथे हा सोहळा पार पडणार आहे. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पात्र वधू-वरांनी २५ जानेवारी २०२७ पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
सामूहिक विवाह चळवळीचा ऐतिहासिक वारसा
स्व. सूर्यकांतादेवी रामचंद्रजी पोटे पाटील चॅरिटेबल ट्रस्टने यापूर्वीही सामाजिक बांधिलकीतून भव्य सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले आहे. २००५ मध्ये २ हजार १०० जोडप्यांचे, तर २००६ मध्ये तब्बल ३ हजार १०० जोडप्यांचे विवाह या माध्यमातून संपन्न झाले होते. त्यावेळी प्रत्येक जोडप्याला १० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले होते. या उपक्रमामुळे महाराष्ट्रात सामूहिक विवाह चळवळीला मोठी चालना मिळाली होती.
या ऐतिहासिक सोहळ्याला तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्यांनी नवदांपत्यांना आशीर्वाद देत उपक्रमाचे कौतुक केले होते. तसेच विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्यांना प्रत्येकी ११ हजार रुपयांचा सहाय्यता निधी जाहीर केला होता. आता याच सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत ट्रस्टने दुष्काळग्रस्त आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या शेतकरी कुटुंबांसाठी पुन्हा सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.
वधू-वरांना विवाह साहित्याची भेट
या सामूहिक विवाह सोहळ्यात प्रत्येक जोडप्याचा विवाह पारंपरिक धार्मिक विधीनुसार संपन्न होणार आहे. प्रत्येक जोडप्यासाठी स्वतंत्र पंडितांची व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय वधू-वरांना कपडे, मंगळसूत्र, ओढणी, दुपट्टा, जॅकेट, चप्पल व बूट आदी आवश्यक साहित्य भेट म्हणून देण्यात येणार आहे.
विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येक जोडप्यासोबत वधूपक्षातील पाच आणि वरपक्षातील पाच अशा एकूण दहा व्यक्तींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असेल. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना विवाहाचा खर्च कमी करून आपल्या मुला-मुलींचे विवाह सन्मानाने पार पाडता येणार आहेत.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक पात्र वधू-वरांनी आधारकार्ड, आवश्यक प्रतिज्ञापत्र, ग्रामपंचायतीचा दाखला, पोलीस पाटील यांचा दाखला आणि सातबारा उतारा (७/१२) ही कागदपत्रे सादर करावीत. इच्छुकांनी आमदार प्रवीण पोटे पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधून अधिकृत नोंदणी करावी.
संपर्क क्रमांक : ७४९९०२२३१३ ७४९९०३६१५३
गरजू शेतकरी कुटुंबांना आधार देण्याचा प्रयत्न
विवाह सोहळ्यांमधील वाढता खर्च सर्वसामान्य कुटुंबांसाठी मोठे आर्थिक आव्हान बनले आहे. त्यात दुष्काळ, शेतीतील नुकसान आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत मुला-मुलींचे विवाह पार पाडताना पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन ट्रस्टने सामूहिक विवाहाच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. विवाहावरील अनावश्यक खर्चाला आळा घालणे, कुटुंबांचा आर्थिक भार कमी करणे आणि नवदांपत्यांना नवजीवनाची सन्मानपूर्वक सुरुवात करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या सामूहिक विवाह सोहळ्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने तसेच विवाह समितीचे बबनराव आवारे, संतोषराव काळपांडे, विवेक हाडोळे, भारतराव खांडे, दत्ताभाऊ कुचे, नितीन कडू, संजयराव काळे, सुदाम पंडागरे, पंजाबराव पवार, लक्ष्मीकांत तायडे, विजय गवळीकर, सतीशराव राऊत, अनिल मलमकर, ज्ञानेश वणवे, घनश्याम पेठे, रविंद्र अंबलकार, शशिकांत कोकाटे, विजय उभाड, ज्ञानदीप येवले, आशिष धाडे, दिलीपराव निंभोरकर, बबनराव लायदे, राम खंडारे, प्रकाश पुंड, डी. निकम, अक्षय पोटे, श्रेयस पोटे पाटील, श्रुतीताई पोटे पाटील, संदीप जाधव, आकाश कदम, रामदेव जोशी, अमोल काळे, सुरेश पठारे व रोहित देशमुख यांनी केले आहे.


