महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कर्जवसुलीसाठी त्रास देणाऱ्या फायनान्स कंपन्या व सावकारांवर कठोर कारवाईचा इशारा; वाडी बुद्रुक उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण

नांदेड (विशेष प्रतिनिधी) : कर्जाच्या तगाद्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत. केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी शासनाने घेतली आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. फायनान्स कंपन्या, बँका, मायक्रो फायनान्स संस्था तसेच सावकारांनी वसुलीसाठी शेतकऱ्यांना त्रास दिल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

नांदेड तालुक्यातील वाडी बुद्रुक येथे रविवारी दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

फायनान्स कंपन्यांनी लावलेल्या तगाद्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शिवसेनेच्या वतीने प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी मुलांच्या शिक्षणाची तसेच मुलींच्या लग्नाची चिंता करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. शिवसेनेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी हदगाव येथे १०० मुलींच्या सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्याच धर्तीवर शिवसेनेच्या आमदार व खासदारांनी शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाचा खर्च उचलावा, असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सिंचन क्षेत्र वाढविणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने ११ जलसंपदा प्रकल्पांना मान्यता देण्यात आली असून १४ हजार ४०० कोटी रुपयांच्या पाणी योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शिवसेनेच्या आमदार व खासदारांनी विकासकामांवर भर द्यावा. विकासकामांसाठी निधीची मुळीच चिंता करू नये, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रारंभी नांदेड उत्तरचे शिवसेना आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी उपजिल्हा रुग्णालयात ये-जा करण्यासाठी वाडी बुद्रुक येथे बसस्थानक उभारण्याची मागणी केली. यावर तात्काळ प्रतिसाद देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी चर्चा करून बसस्थानक उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे गावात एसटी बसची सुविधा सुरू होईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार हेमंत पाटील, प्रतापराव पाटील चिखलीकर, बालाजीराव कल्याणकर, आनंदराव बोंढारकर, बाबुराव कदम कोहळीकर, अमरनाथ राजुरकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गंगाधर बडूरे, उमेश मुंडे, विवेक देशमुख, राज्याचे आरोग्य आयुक्त संजय काटकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, महापालिका आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 बसस्थानक उभारण्याचे आश्वासन

यापूर्वी आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात बसस्थानक उभारण्याची मागणी केली होती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी चर्चा करून ही मागणी मान्य करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अमरनगर ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे वाढदिवसाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

नागपूर, उज्वल रोकडे (प्रतिनिधी) : अमरनगर ज्येष्ठ नागरिक मंडळ, अमरनगर यांच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष देविदासजी आगरकर आणि ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान, नागपूरचे सचिव राजूजी मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम…

शरीर आणि मनाचे संतुलन बिघडल्यास आयुष्यात अशांतता : शकुंतला दिदी

पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : शरीर आणि मनाचे संतुलन राखल्यास दीर्घायुष्य प्राप्त होते. मात्र, हे संतुलन बिघडल्यास आयुष्यात अशांतता निर्माण होऊन अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शरीर, मन आणि आत्म्याचे…