पुणे : पुणेकरांना रोजच्या वाहतूक कोंडीपासून दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरातील उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्ग (HCMTR), रिंगरोड आणि महत्त्वाकांक्षी ‘पाताळलोक’ बोगदा प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. HCMTR प्रकल्पाचे काम 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले असून, त्यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत HCMTR साठी राज्य सरकारच्या विविध विभागांकडील जागा महापालिकेला मोफत हस्तांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच रिंगरोडसाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले. शहरातील भविष्यातील वाहतूक लक्षात घेऊन ‘पाताळलोक’ प्रकल्पालाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या अंतर्गत तीन महत्त्वाच्या बोगद्यांचे नियोजन करण्यात आले असून, त्यांच्या अलाइनमेंट आणि तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ संस्था आणि अभियंत्यांकडून सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये भोसरी-उंड्री-पुरंदर नवीन विमानतळ मार्गावर सुमारे ३६ किलोमीटरचा प्रकल्प प्रस्तावित असून त्यातील बहुतांश भाग बोगद्यामधून जाणार आहे. याशिवाय रामनदी-भूगाव-राजाराम पूल आणि तळजाई टेकडी-पद्मावती-हिंगणे या मार्गांवरही स्वतंत्र बोगदे उभारण्याचे नियोजन आहे.
HCMTR हा सुमारे ४३.६० किलोमीटरचा प्रकल्प असून तो पूर्ण झाल्यानंतर शहरातील वाहतूक कोंडीत २५ ते ३० टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या मार्गामुळे पुण्यातील विविध मेट्रो मार्ग एकमेकांशी जोडले जातील आणि शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल. मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक निधी उभारण्यासाठी योग्य आर्थिक मॉडेल तयार करून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणांना दिले आहेत. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या महत्त्वाच्या प्रकल्पांना आता प्रत्यक्ष गती मिळणार का, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.


