मुंबई : कोरोना विषाणूचे नाव ऐकताच आजही अनेकांच्या मनात लॉकडाऊनचे दिवस आणि त्या काळातील भीतीदायक आठवणी ताज्या होतात. काही वर्षांपूर्वी संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या या महामारीनंतर आता पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात यावर्षी आतापर्यंत ४८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.
कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे. मात्र आरोग्य विभागाने नागरिकांना घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सध्या आढळून आलेली बहुतांश प्रकरणे सौम्य स्वरूपाची असून, राज्यात कोरोनाच्या नव्या मोठ्या लाटेची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रात ४८ कोरोना रुग्णांची नोंद
राज्य आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, २०२६ मध्ये आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाचे ४८ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये जानेवारी महिन्यात ३, फेब्रुवारीत १, जून महिन्यात ११ तर जुलै महिन्यात आतापर्यंत २१ रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे या कालावधीत कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. बहुतांश रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत.
इतर राज्यांमध्येही वाढती रुग्णसंख्या
आंध्र प्रदेशातही कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. २६ जून ते १६ जुलै दरम्यान येथे कोविड-१९ चे १२ रुग्ण आढळले होते. यापैकी काही रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यांना आधीपासूनच गंभीर स्वरूपाच्या आरोग्य समस्या होत्या. यानंतर महाराष्ट्रातही काही रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात असून आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बदलत्या हवामानात सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नये. गर्दीच्या ठिकाणी आवश्यक काळजी घ्यावी, स्वच्छता राखावी आणि आरोग्याची योग्य काळजी घ्यावी. कोरोनाचा धोका पूर्णपणे संपलेला नसला तरी सध्या घाबरण्याची गरज नाही. सतर्कता आणि योग्य काळजी हाच कोरोनापासून बचावाचा सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.


