पुणे : आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात सोमवारी सकाळी जेजुरीजवळ भीषण अपघात घडला. सासवड-जेजुरी मार्गावरील भोंगळे मळा परिसरात पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना ट्रकने धडक दिल्याने तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
ही घटना बेलसर टोल नाक्यापासून जेजुरीच्या दिशेने सुमारे ५०० मीटर अंतरावर असलेल्या हॉटेल शिपदीप लॉजिंगसमोर घडली. अपघातानंतर जखमी महिलांना तातडीने जेजुरी येथील रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.प्राथमिक माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील दिंडीचा ट्रक आणि सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील दिंडीतील महिला वारकरी यांच्यात हा अपघात झाला. सात महिला वारकरी रस्त्याने पायी जात असताना ट्रकची जोरदार धडक बसल्याचे सांगितले जात आहे.
या दुर्घटनेत नंदा पवार (वय ६०, रा. कवलापूर, ता. मिरज), माधवी राजाराम सलगरे (वय ५५, रा. मालगाव, ता. मिरज) आणि राजश्री शंकर भोसले (वय ५५, रा. कसबे डिग्रज, ता. मिरज) यांचा मृत्यू झाला. तिघीही सांगली जिल्ह्यातील रहिवासी आहेत. अपघातातील ट्रक चालक बालाजी एकनाथ डक (वय ६३, रा. पिंपळगाव, जि. नांदेड) याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलीस, स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. काही काळ सासवड-जेजुरी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी रुग्णालयात पाठवले आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे वारकरी संप्रदायात शोककळा पसरली असून वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


