रायगड : रायगड जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे एक धक्कादायक घटना घडली आहे. खालापूर तालुक्यातील चावणे-जांभिवली परिसरातील हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल)च्या एलपीजी बॉटलिंग प्लांटची संरक्षण भिंत पुराच्या जोरदार प्रवाहामुळे कोसळल्याने सुमारे 3 हजार भरलेले आणि रिकामे गॅस सिलेंडर पाताळगंगा नदीत वाहून गेले. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने हाय अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.
बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. पुराच्या वेगवान पाण्याचा तडाखा एचपीसीएल प्लांटला बसला आणि संरक्षण भिंत कोसळताच तेथे साठवून ठेवलेले हजारो एलपीजी सिलेंडर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. सिलेंडर नदीत वाहून जात असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.या घटनेची माहिती मिळताच अनेक नागरिक नदीकाठावर जमा झाले. काही ग्रामस्थ तर वाहून आलेले सिलेंडर मिळवण्यासाठी थेट पाण्यात उतरल्याचेही दिसून आले. मात्र, अशा प्रकारे सिलेंडर उचलणे किंवा स्वतःकडे ठेवणे अत्यंत धोकादायक असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
सिलेंडर आढळल्यास तात्काळ प्रशासनाकडे जमा करा
रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नागरिकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. नदीतून किंवा परिसरात वाहून आलेले गॅस सिलेंडर कोणत्याही परिस्थितीत स्वतःजवळ ठेवू नयेत किंवा त्यांची हाताळणी करू नये. असे सिलेंडर आढळल्यास ते तात्काळ एचपीसीएल कंपनी, जवळचे गॅस वितरक, खालापूर किंवा पेण तहसीलदार कार्यालय अथवा उपविभागीय अधिकारी कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाने नागरिकांना कोणताही धोका पत्करू नये आणि सिलेंडरबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ संबंधित यंत्रणांना कळवण्याचेही आवाहन केले आहे. सिलेंडर स्वतःकडे ठेवणे किंवा वापरण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.


