आळंदी : आषाढी वारीचा सर्वाधिक भावनिक आणि भक्तिमय क्षण बुधवारी आळंदीत अनुभवायला मिळाला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या १९५ व्या आषाढी पायी वारीच्या प्रस्थान सोहळ्याला पहाटे घंटानादाने सुरुवात झाली. पहाटेपासूनच हजारो वारकरी माऊलींच्या समाधी दर्शनासाठी आळंदीत दाखल झाले असून संपूर्ण परिसर “ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड जयघोषाने दुमदुमून गेला.
प्रस्थान सोहळ्याची सुरुवात पवमान अभिषेक, पंचामृत पूजा आणि दूध आरतीने झाली. त्यानंतर भाविकांसाठी मंदिर दर्शन खुले करण्यात आले. दुपारी महानैवेद्यानंतर मंदिर परिसर स्वच्छ करून मानाच्या दिंड्यांतील वारकऱ्यांना मुख्य महाद्वारातून प्रवेश देण्यात आला. यानंतर प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य धार्मिक विधींना प्रारंभ झाला. माऊलींच्या पादुकांना सजवलेल्या पालखीत विराजमान करण्यापूर्वी संजीवन समाधी मंदिराची प्रदक्षिणा घालण्यात आली. त्यानंतर सायंकाळी सुमारे सहाच्या सुमारास पालखीने महाद्वारातून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले.
टाळ-मृदंगाच्या निनादात, भगव्या पताका खांद्यावर घेतलेले वारकरी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विठ्ठलनामात तल्लीन झालेल्या महिला आणि उत्साहाने सहभागी झालेली तरुणाई यामुळे संपूर्ण आळंदी भक्तिमय वातावरणात रंगून गेली. देऊळवाडा परिसरात फेर, फुगड्या आणि हरिनामाच्या गजराने भक्तिरसाची अनोखी अनुभूती निर्माण झाली.
यंदा प्रस्थान सोहळ्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने मर्यादित वारकऱ्यांना प्रवेश देण्यात आला असून संपूर्ण परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पावसाच्या सरी सुरू असतानाही वारकऱ्यांचा उत्साह मात्र तसूभरही कमी झालेला दिसला नाही. रात्री उशिरा माऊलींचा पालखी सोहळा पहिल्या मुक्कामासाठी दर्शन मंडप इमारतीत विसावणार आहे.


