मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगू लागली आहे. अभिनेता विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊ यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाबाबत मोठा दावा केला आहे. १५ आमदार आणि २५ नगरसेवक पक्ष सोडण्याच्या मार्गावर असल्याचा दावा करत त्यांनी उद्धव ठाकरे यांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच ७ सप्टेंबर ही तारीख लक्षात ठेवण्यासही सांगितले आहे.
व्हिडिओमध्ये हिंदुस्तानी भाऊ म्हणतात, “उद्धवसाहेब, जय महाराष्ट्र… मी यापूर्वीही सांगितलं होतं, सांभाळा. १५ आमदार आणि २५ नगरसेवक जाण्याच्या मार्गावर आहेत. सचिन अहिर हा पहिला बॉम्ब फुटला आहे. सप्टेंबरपर्यंत अजून बरेच काही घडणार आहे. ७ सप्टेंबर ही तारीख लक्षात ठेवा.”यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. नाव न घेता “भांडुपचा खोटा अनिल कपूर” असा उल्लेख करत, “त्यांना आता तरी तोंड बंद करायला सांगा, अन्यथा त्यांचेच ‘तुडवा ऑपरेशन’ सुरू होईल,” असा इशारा दिला. तसेच दगडी चाळ, सातरस्ता आणि अरुण गवळी यांचाही उल्लेख करत त्यांनी आपली भूमिका मांडली.
हिंदुस्तानी भाऊ यांनी पुढे संजय राऊत यांच्यावर टीका करत, शिवसेना सोडून जाणारे अनेक नेते त्यांच्या वक्तव्यांमुळे नाराज असल्याचा आरोप केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वशैलीचा उल्लेख करत, त्यांनी शिवसैनिकांशी नेहमी संवाद साधला आणि कोणालाही दुखावले नाही, असेही ते म्हणाले. आज ज्यांनी बाळासाहेबांचा अपमान केला, त्यांनाच सोबत घेतल्यामुळे पक्षात अस्वस्थता निर्माण झाली असून, “तुमच्याजवळ कोण राहणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.


