विरार : मुंबईसह उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेला पुन्हा बसला आहे. नालासोपारा स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने बुधवारी सकाळपासून लोकल गाड्या संथ गतीने धावत असून अनेक गाड्या तब्बल ४५ मिनिटांपर्यंत उशिराने धावत आहेत. त्यामुळे कार्यालये आणि इतर कामांसाठी बाहेर पडलेल्या हजारो प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई, नालासोपारा आणि विरारदरम्यानची रेल्वे वाहतूक वारंवार विस्कळीत होत आहे. मागील दोन दिवस या मार्गावरील लोकल सेवेला मोठा फटका बसला होता. आजही नालासोपारा स्थानकातील रुळांवर पाणी कायम असल्याने गाड्यांचा वेग कमी करण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाने रुळांवरील पाणी उपसण्यासाठी पंपांची व्यवस्था केली असली तरी पाण्याचा निचरा पूर्णपणे झालेला नाही. परिणामी लोकल गाड्या उशिराने धावत असून नालासोपारा, वसई आणि विरार स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेकांना कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचता आले नाही.
दरम्यान, वसई तालुक्यात गेल्या २४ तासांत १८२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर आतापर्यंतचा एकूण पाऊस १,६४२ मिमी इतका झाला आहे. नालासोपारा पूर्व आणि पश्चिम भागातील अनेक ठिकाणी अजूनही गुडघाभर पाणी साचले असून दैनंदिन जनजीवनावर त्याचा परिणाम होत आहे.सध्या पावसाचा जोर कायम असल्याने पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा पूर्ववत होण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो. त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलच्या वेळापत्रकाची माहिती घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


