पुणे : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी अखेर न्यायालयाने कठोर निर्णय दिला आहे. विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (६५) याला फाशीची शिक्षा सुनावत या प्रकरणाला न्याय मिळवून दिला.
या प्रकरणाचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. न्यायालयाने निकाल वाचून दाखवताना हा गुन्हा ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट नमूद केले. आरोपीविरोधात सादर करण्यात आलेले पुरावे ठोस असून तपास यंत्रणांनी गुन्ह्यातील प्रत्येक दुवा प्रभावीपणे जोडला, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
न्यायालयाने आरोपीच्या वयाचा विचार केला असला तरी त्याला शिक्षेत कोणतीही सवलत देण्यास कारण नसल्याचे स्पष्ट केले. स्वतःची वासना पूर्ण करण्यासाठी आरोपीने हे अमानुष कृत्य केल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्याचबरोबर आरोपीचा गुन्हेगारी पूर्वइतिहासही गंभीर असल्याने त्याच्यामध्ये कायद्याचा धाक उरला नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.
या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील अपहरण, बलात्कार, खून, विनयभंगासाठी बळजबरी यासह पोक्सो कायद्यांतर्गत विविध गंभीर कलमांखाली दाखल करण्यात आलेले सर्व आरोप न्यायालयात सिद्ध झाले.घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त झाला होता. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून वेगाने तपास सुरू केला. अवघ्या १५ दिवसांत सुमारे १,२०० पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. २१ मेपासून या खटल्याची दैनंदिन सुनावणी सुरू झाली होती. सरकारी पक्षाने पीडितेच्या कुटुंबीयांसह प्रत्यक्षदर्शी, पंच, तपास अधिकारी, न्यायवैद्यकीय तज्ज्ञ आणि डीएनए विश्लेषक अशा ५० हून अधिक साक्षीदारांची साक्ष न्यायालयासमोर मांडली.
विशेष म्हणजे, या प्रकरणात अवघ्या ५८ दिवसांत सुनावणी पूर्ण करून निकाल देण्यात आला. त्यामुळे राज्यातील जलद न्यायप्रक्रियेचे हे महत्त्वाचे उदाहरण ठरले आहे.निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.


