कीर्तनकारांनी सामाजिक विषयांना चालना दिली पाहिजे : प्रकाश महाराज वाघ

कीर्तनातून समाजातील समस्या मांडण्याचे आवाहन; विविध कीर्तनकारांना पुरस्कार प्रदान

गुरुकुंज मोझरी, राज माहोरे (प्रतिनिधि) : सध्या समाजात काय चालले आहे आणि समाजाला कशाची गरज आहे, याचा अभ्यास करून कीर्तनकारांनी सामाजिक समस्या ठळकपणे मांडल्या पाहिजेत, असे प्रतिपादन कीर्तन संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश महाराज वाघ यांनी केले.

यावेळी उपसर्वाधिकारी बाबाराव पाटील, प्रचारप्रमुख गोपाल कडू, माजी सर्वाधिकारी लक्ष्मण गमे, मुकुंदराव निस्ताने, रमेश ढवळे, अरविंद काळमेघ, माधुरी ढवळे, अन्ना महाराज शिरवाळकर, डॉ. प्रशांत ठाकरे, पौर्णिमा सवाई आणि मानकर स्वामी आदी उपस्थित होते. प्रकाश महाराज वाघ म्हणाले की, राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचे विचार आणि वारकरी संप्रदायाचे विचार यांमध्ये एकच तत्त्व मांडले आहे. कीर्तनकारांनी समाजाला त्रुटीमुक्त विचार सांगणे महत्त्वाचे आहे. त्यातून समाजात सकारात्मक विचारांचा प्रसार होतो; अन्यथा समाजात विकृती निर्माण होण्याची शक्यता असते.

राष्ट्रपती भवनात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ‘हे दिनबंधू! सुनो हमारी। किसान का कब भला करें।’ हे भजन सादर करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. त्यांनी हे भजन सादर करण्यामागील कारण स्पष्ट करताना सांगितले होते की, शेतकऱ्यांनी शेतीत शेतमाल पिकविणे बंद केले, तर आपली खंजिरीही आपोआप बंद होईल. यावरून संपूर्ण अर्थचक्र शेतीवर अवलंबून असल्याचे स्पष्ट होते. यंदाच्या दुष्काळामुळे या वास्तवाची जाणीव अधिक प्रकर्षाने झाली आहे, असे वाघ यांनी सांगितले.

अध्यात्म आणि विज्ञान यांच्यातील वाद राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दूर केला. ‘अध्यात्म और विज्ञान के संयोगसे सब हो सुखी’ हा त्यांचा विचार होता. डोळ्यांची दृष्टी कमजोर झाल्यास विज्ञानाच्या मदतीने चष्मा किंवा लेन्सचा उपयोग करता येतो; मात्र नजरेमागील भावना खराब झाल्यास ती सुधारण्यासाठी अध्यात्माची आवश्यकता असते, असे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रसंतांच्या विचारांची खोली समजून घेण्यासाठी कीर्तनकारांनी त्यांचे ‘आनंद प्रभाव’ आणि ‘आनंदामृत’ हे साहित्य वाचले पाहिजे. ‘गुरुदेव ऐसी हो दया, जग का अंधेरा दूर हो’ या प्रार्थनेतून राष्ट्रसंतांचा मानवतावादी दृष्टिकोन स्पष्ट होतो. हा विचार कीर्तनकारांनी समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी ह.भ.प. सचिन पवार, अॅड. कैलास चव्हाण आणि ह.भ.प. संदीप गिहे यांनी कीर्तन सादर करताना कोणत्या चुका टाळाव्यात, याबाबत मार्गदर्शन केले. रमेश ढवळे यांनी कीर्तन संमेलन अधिक यशस्वी करण्यासाठी संयोजकांना काही सूचना केल्या. समारोपीय कीर्तन संमेलनाचे संयोजन अमोल बांबल यांनी केले.

कीर्तनकारांना विविध पुरस्कारांनी सन्मानित

राज्यातील विविध भागांतून आलेल्या कीर्तनकारांनी उत्कृष्ट कीर्तनकला सादर केल्याबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यामध्ये गौरव महाराज चांगुले (बीड) यांना ज्ञानदीप पुरस्कार, कृष्णा शिरसाट (अहिल्यानगर) यांना अमृत पुरस्कार, निलेश लोनगाडगे (आळंदी) यांना सुवर्ण पुरस्कार, शिवज्ञानंद दराडे (हिंगोली) यांना रौप्य पुरस्कार, सुप्रियाताई बंडगर (संभाजीनगर) यांना भरारी पुरस्कार, अभिषेक भुसे (नागपूर) यांना प्रेरणा पुरस्कार, अनिल बोदडे (बुलढाणा) यांना अक्षरदीप पुरस्कार, अभिजीत बेलुरकर (वरखेड) यांना प्रविण पुरस्कार, ज्योतीताई बिडगर (मनमाड) यांना सुजन पुरस्कार आणि राम चांदने (बुलढाणा) यांना प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन पुरस्कारप्राप्त कीर्तनकारांचा गौरव करण्यात आला.

आजचे कार्यक्रम

गुरुकुंज मोझरी येथे आज विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ ते ८ वाजता योग व प्राणायाम, सकाळी ८ ते ९ वाजता राम सातेगावकर यांचे ग्रामगीता प्रवचन, त्यानंतर अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा सभासदांची परिषद व पुरस्कार प्रदान कार्यक्रम होणार आहे.

दुपारी २.३० ते ३ वाजता समर्थ आडकोजी महाराज संस्थान वरखेड, जन्मभूमी यावली तसेच तपोभूमी गोंदोडा येथून आलेल्या पालख्यांचे स्वागत व पूजन करण्यात येणार आहे. दुपारी ३ ते ६ या वेळेत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना श्रद्धांजली, सर्वधर्मीय प्रार्थना, महाआरती, राष्ट्रवंदना व सामुदायिक प्रार्थना होईल.

सायंकाळी ६ ते ७ वाजता स्वरगुरुकुंजाच्या वतीने खंजिरी भजन सादर केले जाईल. सायंकाळी ७ ते ९ वाजता ह.भ.प. विशाल खोले महाराज यांचे कीर्तन होणार आहे. रात्री ९ ते १०.३० या वेळेत ‘माणुसकीचा ध्यास’ अंतर्गत नवाब भीमराव पांचाळे यांचा गजल गायनाचा कार्यक्रम होईल. रात्री १०.३० ते ११.३० या वेळेत लक्ष्मणदास काळे महाराज यांचे कीर्तन होणार आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

संत कंवरराम साहिब यांच्या शहादत दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रम

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : अमर शहीद संत कंवरराम साहिब यांच्या शहादत दिनानिमित्त रविवार, १ नोव्हेंबर रोजी अमरावतीतील सिंधू नगर मैदानावर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

आज गुरुकुंज आश्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली

गुरुकुंज मोझरी, राज माहोरे (प्रतिनिधि) : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी गुरुकुंज आश्रमात भावपूर्ण मौन श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…