अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांच्या आगामी ‘ईठा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट चर्चेत आला आहे. मात्र आता या चित्रपटाच्या शीर्षकावर आणि कथानकातील काही संदर्भांवर लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतला आहे. चित्रपटाचे नाव बदलावे, तसेच प्रदर्शित होण्यापूर्वी तो कुटुंबीयांना दाखवावा, अशी त्यांची मागणी आहे.
विठाबाई यांचे पुत्र कैलास नारायणगावकर यांनी सांगितले की, चित्रपटाची माहिती त्यांना नुकतीच मिळाली. आईच्या आयुष्यावर चित्रपट तयार होत असल्याचा आनंद असला, तरी निर्मितीपूर्वी कुटुंबीयांशी चर्चा झाली असती, तर अनेक ऐतिहासिक आणि वैयक्तिक गोष्टी अधिक अचूकपणे मांडता आल्या असत्या, असे त्यांनी नमूद केले.
चित्रपटाचे नाव ‘ईठा’ ऐवजी ‘विठा’ किंवा ‘विठाबाई नारायणगावकर’ असे ठेवावे, अशी त्यांची भूमिका आहे. ग्रामीण भागात ‘विठा’चा उच्चार ‘ईठा’ असा केला जात असला, तरी पुढील पिढीपर्यंत विठाबाईंचे मूळ नाव पोहोचणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, विठाबाई यांचे नातू मोहित नारायणगावकर यांनीही चित्रपटाच्या शीर्षकासह काही ऐतिहासिक संदर्भांवर नाराजी व्यक्त केली. ‘नारायणगावकर’ हे आडनाव चित्रपटाच्या शीर्षकात किंवा उपशीर्षकात असावे, अशी त्यांची मागणी आहे. तसेच चित्रपटासाठी आधार म्हणून वापरण्यात आलेल्या काही माहितीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
कुटुंबीयांनी निर्माते आणि दिग्दर्शकांकडे ई-मेलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असून, ३ जुलैपर्यंत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कायदेशीर कारवाईचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही दिला आहे. विठाबाईंच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे स्वागतच आहे, मात्र त्यात चुकीची किंवा आक्षेपार्ह माहिती असल्यास ती स्वीकारली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका कुटुंबीयांनी मांडली.


