नांदेड: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या निधीत अनियमितता करून 2 कोटी 7 लाख 1 हजार 724 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी माहूर नगरपंचायतीचे तत्कालीन मुख्याधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी मुंबई येथील म्हाडा दक्षता व सुरक्षा विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी माहूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, माहूर नगरपंचायतीत 7 सप्टेंबर 2018 ते 9 ऑगस्ट 2021 या कालावधीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलधारकांना वितरित करण्यात येणाऱ्या निधीमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये निधी जमा करण्याऐवजी 2 कोटी 7 लाख 1 हजार 724 रुपयांची रक्कम इतर खात्यांमध्ये अनियमितपणे वर्ग करण्यात आली. त्यामुळे शासनाच्या निधीचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.या तक्रारीची दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांच्या आदेशानुसार माहूर नगरपंचायतीचे तत्कालीन मुख्याधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर प्रकरणात नोंदविण्यात आलेल्या तक्रारीनुसार निधी वितरण प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत


