बारामती पोटनिवडणुकीकडे आज संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून सकाळीच सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावत बारामतीकरांना मतदान करण्याचं आवाहन केलं. दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होत आहे. या निमित्ताने पवार कुटुंब एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शरद पवार स्वतः मतदानाला उपस्थित नसले तरी त्यांनीही सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ मतदारांना आवाहन केलं आहे. त्यामुळे याआधी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये एकमेकांविरुद्ध उभे राहिलेले पवार कुटुंबीय आता एकत्र दिसत आहेत.
दरम्यान, 2029 च्या विधानसभा निवडणुकीची चर्चा देखील रंगू लागली आहे. रोहित पवार यांनी भविष्यात बारामतीत ‘पवार विरुद्ध पवार’ अशी लढत होऊ शकते, असं विधान केलं. त्यावर प्रतिक्रिया देताना युगेंद्र पवार यांनी हे रोहित पवार यांचं वैयक्तिक मत असल्याचं स्पष्ट केलं. यापूर्वी कुटुंबातील सदस्य एकमेकांविरुद्ध लढल्याचं दुःख असून आता तशी परिस्थिती नको, अशी भूमिका त्यांनी मांडली.
जय पवार यांनीही 2029 मध्ये उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांची मागणी असल्याचं सांगितलं, मात्र स्वतःला कार्यकर्ता म्हणून काम करायचं असल्याचं नमूद केलं. यावर रोहित पवार म्हणाले की, पक्ष आणि कार्यकर्त्यांचा निर्णय महत्त्वाचा असतो आणि परिस्थितीनुसार उमेदवार ठरतो.
याचदरम्यान, अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनीही या वक्तव्यांवर नाराजी व्यक्त केली. सध्याचा दिवस महत्त्वाचा असून अशा चर्चांना वाव देण्याची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. एकूणच, बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र दिसत असलं तरी भविष्यातील राजकीय समीकरणांबाबत चर्चा रंगू लागल्याचं चित्र आहे.


