पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : स्वर्गीय सुरेश कलमाडी यांच्या स्मृतीस समर्पित ४० व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन २०२६ चे आयोजन ६ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेतून पर्यावरणीय शाश्वततेला पाठिंबा देण्याचा संदेश दिला जाणार असल्याची घोषणा पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी आतापर्यंत १० हजारांहून अधिक धावपटूंची नोंदणी पूर्ण झाली आहे.
पुण्यासह देशातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी स्वर्गीय सुरेश कलमाडी यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, असे ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले. पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे ४० वे पर्व म्हणजे केवळ क्रीडा स्पर्धेचा टप्पा नसून, हजारो धावपटूंच्या स्वप्नांचा, संघर्षाचा, यशाचा आणि प्रेरणादायी प्रवासाचा गौरवशाली इतिहास आहे. ही स्पर्धा क्रीडा क्षेत्रातील अमूल्य योगदानाला अभिवादन करणारी आणि पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी दृष्टी जपणारी ठरणार आहे.
या स्पर्धेच्या संचालकपदी श्री. सुमंत वायकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर श्री. वसंत गोखले तांत्रिक स्पर्धा संचालक म्हणून, तसेच सुश्री कौर आणि रोहन मोरे संयुक्त स्पर्धा संचालक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. या स्पर्धेसाठी नावनोंदणीची अंतिम तारीख २० नोव्हेंबर २०२६ आहे. मॅरेथॉनच्या ४० व्या पर्वाचा भाग होण्यासाठी इच्छुक धावपटूंनी मुदतीपूर्वी नोंदणी पूर्ण करावी. तसेच पुणेकर नागरिक, धावपटू, शैक्षणिक संस्था, कॉर्पोरेट कंपन्या आणि सामाजिक संघटनांनी या क्रीडा महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


