पुणे ,राजन शेळके (प्रतिनिधी) : पुणेकरांसाठी मनोरंजनाची एक अनोखी पर्वणी येणार आहे. पुण्यात प्रथमच आंतरराष्ट्रीय सर्कस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, व्हिएतनाम, मॅक्सिको, इथिओपिया, नेपाळ आणि भारत या पाच देशांतील सर्कस कलाकार आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करणार आहेत. प्रसिद्ध रॅम्बो सर्कसतर्फे ५ ते १५ नोव्हेंबरदरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
बाणेर येथील बंतरा भवन, सर्व्हे क्रमांक १०४/१, मर्सिडीज शोरूमजवळ, मुंबई-बंगळुरू महामार्ग येथे सर्कसचे प्रयोग होणार आहेत. या महोत्सवात दररोज दुपारी १, ४ आणि सायंकाळी ७ वाजता असे तीन शो आयोजित करण्यात येणार आहेत. तिकिटांचे दर ५०० रुपयांपासून सुरू असून, बुक माय शो आणि सर्कसच्या ठिकाणी तिकिटे उपलब्ध असतील. तसेच ८३०६४३०६४३ या क्रमांकावर संपर्क साधूनही बुकिंग करता येणार आहे, अशी माहिती रॅम्बो सर्कसचे पार्टनर सुजित दिलीप यांनी दिली.
या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे पाच देशांतील कलाकारांचे थरारक सादरीकरण. व्हिएतनामचे कलाकार जार बॅलन्सिंग आणि हवाई पट्ट्यांवरील ड्युओ अॅक्ट्स सादर करणार आहेत. इथिओपियाचे कलाकार पोल शोल्डर बॅलन्सिंग आणि ड्युओ फ्रेम्समधून ताकद व समन्वयाचे दर्शन घडवतील. तर मॅक्सिकोचे कलाकार केसांच्या साहाय्याने हवेत लटकण्याचा धाडसी प्रयोग सादर करणार आहेत. नेपाळमधील कलाकारही आपल्या विविध कलाकौशल्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणार आहेत.
केवळ पारंपरिक सर्कसपुरता हा महोत्सव मर्यादित नसून, यात आधुनिक मनोरंजनाचीही खास मेजवानी असणार आहे. विदूषकांचे विनोदी सादरीकरण, हाय-एनर्जी स्लिंकी परफॉर्मन्स, आकर्षक एलईडी डान्स, हवाई कसरती आणि अॅक्रोबॅटिक्स यामुळे कार्यक्रमात रंगत येणार आहे. अचूकता, शारीरिक ताकद, लवचिकता आणि अनेक वर्षांच्या सरावातून साकारलेल्या या कसरती प्रेक्षकांना थक्क करणाऱ्या ठरणार आहेत. विविध देशांच्या सर्कस परंपरा आणि आधुनिक सादरीकरण यांचा संगम या महोत्सवातून अनुभवता येणार आहे.
रॅम्बो सर्कससाठी हा आंतरराष्ट्रीय महोत्सव म्हणजे विविध संस्कृतींमधील सर्कस कला, कौशल्य, शिस्त आणि सर्जनशीलतेचा उत्सव आहे. आंतरराष्ट्रीय कलाकारांना एकाच व्यासपीठावर आणून प्रेक्षकांना जागतिक सर्कस कलेची ओळख करून देणे हा या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. कुटुंबीय, लहान मुले आणि सर्व वयोगटांतील प्रेक्षकांसाठी हा महोत्सव खास आकर्षण ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या थरारक कसरती, विनोद आणि आधुनिक मनोरंजनाचा अनुभव पुणेकरांना एकाच ठिकाणी घेता येणार आहे।


