लोहा, (प्रतिनिधी): राज्यात विशेषतः मराठवाड्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना खासगी फायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांची सक्तीने कर्जवसुली केली जात असल्याच्या निषेधार्थ लोहा येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी श्रीराम फायनान्स व बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयांची तोडफोड केली. ही घटना २ नोव्हेंबर रोजी सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी चौघांविरुद्ध लोहा पोलिसांत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात कोरड्या दुष्काळाची परिस्थिती असताना खासगी वित्तपुरवठा करणाऱ्या कंपन्या शेतकऱ्यांच्या दारात जाऊन जबरदस्तीने कर्जवसुली करत असल्याचा आरोप शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. महिलांना कर्जवसुलीसाठी त्रास दिल्यास फायनान्स कंपन्यांची कार्यालये शिल्लक ठेवणार नाही, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष प्रा. बाळासाहेब जाधव सुनेगावकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी लोहा शहरातील श्रीराम फायनान्स व बजाज फायनान्स कार्यालयांची तोडफोड केली. यावेळी कार्यकर्त्यांनी संघटनेच्या समर्थनार्थ आणि रविकांत तुपकर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.
दुष्काळामुळे शेतकरी आणि शेतमजुरांचे मोठे नुकसान झाले असून त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत मायक्रोफायनान्स आणि खासगी फायनान्स कंपन्यांकडून सक्तीची वसुली केली जात असल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला होता. नांदेड येथील चंद्रकांत शिंदे आणि लातूर येथील दत्तात्रय कुंभार या दोन शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.या आंदोलनावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शहाजी पाटील शिंदे, जिल्हा संघटक कैलास पाटील, तालुकाप्रमुख पांडुरंग पवार यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सक्तीची कर्जवसुली थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन
शेतकऱ्यांचे दुष्काळामुळे मोठे नुकसान झाले असून शेतकरी व शेतमजुरांची अवस्था अत्यंत बिकट आहे. अशा परिस्थितीत फायनान्स कंपन्यांनी सक्तीची कर्जवसुली थांबवावी. सरकारने एक वर्षाचे व्याज माफ करावे तसेच शेतकऱ्यांचा सिव्हिल स्कोअर खराब करू नये. अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. बाळासाहेब पाटील जाधव सुनेगावकर यांनी दिला.


