नांदेड (विशेष प्रतिनिधी) : राज्यातील नांदेड, हिंगोली, बीड व अहिल्यानगरसह इतर न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाल्यानंतर नांदेड पोलीस सतर्क झाले. पोलिसांनी तातडीने जिल्हा न्यायालयात धाव घेतली. यावेळी पोलीस वाहनातील ध्वनिक्षेपकाद्वारे आवाहन करून काही क्षणांतच संपूर्ण न्यायालय रिकामे करण्यात आले. ही घटना सोमवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली.
राज्यातील विविध न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी अज्ञात व्यक्तींनी ई-मेलद्वारे दिल्याचे समोर आल्यानंतर नांदेड पोलिसांनी तातडीने कारवाई केली. ध्वनिक्षेपकाद्वारे आवाहन करून संपूर्ण न्यायालय व परिसर रिकामा करण्यात आला. त्यानंतर बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या पोलीस निरीक्षक मीना तोटावर यांनी पथकातील सहकारी अधिकारी, कर्मचारी आणि श्वानासह घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण न्यायालय परिसराची कसून तपासणी करण्यात आली.
तपासणीनंतर ही अफवा असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे न्यायालयातील न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार, मुद्रांक विक्रेते व नोटरी यांनी सुटकेचा श्वास सोडला. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नरेंद्र ब्रह्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर राम रामेश्वर वेंजने, पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे, वजीराबादचे पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्यासह इतर पोलीस अधिकारी, जलद प्रतिसाद पथक, पोलीस अंमलदार व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अफवांवर विश्वास ठेवू नका : पोलीस अधीक्षक
दरम्यान, अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. अशा काही अफवा कानावर आल्यास घाबरून न जाता तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी केले आहे.


