जनहिताची बांधिलकी जपत ३६ वर्षांची प्रशासकीय सेवा; जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांना सन्मानपूर्वक निरोप

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरव; नूतन जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांचे स्वागत

परभणी : परभणी जिल्ह्याच्या विकासाला गती देणे, विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांप्रति संवेदनशील दृष्टिकोन ठेवून प्रशासकीय जबाबदारी पार पाडणारे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांना सेवानिवृत्तीनिमित्त सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला. पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी नूतन जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांचे स्वागत करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित या निरोप समारंभाला महापौर सय्यद इकबाल सय्यद खाजा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी, सेलूचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव, अप्पर जिल्हाधिकारी शोभा जाधव, महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, जीवराज डापकर, शैलेश लाहोटी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, पत्रकार आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी संजयसिंह चव्हाण यांच्या पत्नी संयोगिता चव्हाण व कुटुंबीयही उपस्थित होते.

प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात श्री. चव्हाण यांचे योगदान महत्त्वाचे – पालकमंत्री

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी आपल्या कार्यकाळात परभणी जिल्ह्यातील अनेक प्रलंबित प्रश्न कौशल्यपूर्ण पद्धतीने मार्गी लावले. जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासोबतच अनेक लोकाभिमुख कामे प्रभावीपणे पूर्ण केली. प्रशासकीय अनुभव, निर्णयक्षमता आणि कामाप्रती असलेली बांधिलकी यांमुळे जिल्ह्यातील विविध कामांना गती मिळाली. त्यांच्या कार्याचा जिल्ह्याच्या प्रशासकीय वाटचालीत महत्त्वाचा ठसा उमटला आहे.

संवेदनशील आणि सरळ व्यक्तिमत्त्वाचे अधिकारी

कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी संजयसिंह चव्हाण यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. ते सरळ, संवेदनशील आणि सहकार्याची भावना जपणारे व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगत त्यांच्या कार्यकाळात विद्यापीठाशी संबंधित महत्त्वाची कामे मार्गी लागल्याचे नमूद केले. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव मूल्यवान असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी श्री. चव्हाण यांच्या प्रशासकीय कार्यशैलीचे कौतुक केले. विविध विषयांवर तातडीने निर्णय घेऊन कामे मार्गी लावण्याची त्यांची हातोटी उल्लेखनीय होती. त्यांच्या कार्यपद्धतीतून प्रशासनातील तत्परता आणि कर्तव्यनिष्ठेचे दर्शन घडल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांनी संजयसिंह चव्हाण यांच्या सुसंस्कृत आणि संवेदनशील कार्यपद्धतीचा गौरव केला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आपुलकी आणि प्रशासकीय कामातील सकारात्मक दृष्टिकोन अधोरेखित केला.

३६ वर्षांच्या सेवेत जनहिताला दिले प्राधान्य

सत्काराला उत्तर देताना जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण भावुक झाले. प्रशासकीय सेवेत आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला, याचे मनस्वी समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या ३६ वर्षांच्या सेवाकाळात प्रशासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक, गोरगरीब आणि गरजू व्यक्तींची कामे करता आली, हीच आपल्यासाठी मोठी उपलब्धी असल्याचे त्यांनी नमूद केले. परभणी जिल्ह्यातील कार्यकाळात अनेक आव्हानात्मक परिस्थितींना सामोरे जावे लागले. मात्र, सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सहकाऱ्यांच्या मदतीने विविध कामे सचोटीने पूर्ण करता आली. प्रशासकीय कामकाज करताना सामान्य माणूस हाच केंद्रबिंदू असला पाहिजे. प्रत्येक नागरिकाचे प्रश्न संवेदनशीलतेने समजून घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न प्रशासनातील प्रत्येक घटकाने करावा, असा संदेशही त्यांनी दिला.

नूतन जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी परभणी जिल्ह्याच्या विकासकामांना अधिक गती देतानाच नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, असे सांगितले. जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी समन्वयाने आणि सकारात्मक दृष्टिकोनातून काम करण्यावर भर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अनुकंपाधारकांना नियुक्तीपत्रांचे वितरण

यावेळी पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते वीस अनुकंपाधारकांना नियुक्तीपत्रे तसेच शिफारसपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या प्रशासकीय कार्याचा आणि जिल्ह्याच्या विकासातील योगदानाचा प्रवास उलगडणारी चित्रफीत दाखविण्यात आली. त्यांच्या सेवाकार्याच्या आठवणींना या चित्रफितीच्या माध्यमातून उजाळा मिळाला.

विविध अधिकारी आणि मान्यवरांनी त्यांच्या कार्यशैलीचे व प्रशासकीय योगदानाचे स्मरण करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रशासकीय सेवेत केलेल्या कामाचा ठसा आणि सहकाऱ्यांच्या मनात निर्माण केलेला विश्वास यांची आठवण जपत संजयसिंह चव्हाण यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला, तर नूतन जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांचे स्वागत करण्यात आले.

 

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

मुंबईकरों के लिए बड़ी राहत! मनोरी में बनेगा समुद्र के पानी को पीने लायक बनाने वाला प्रोजेक्ट

मुंबई : देश की आर्थिक राजधानी मुंबई में बढ़ती आबादी के साथ पानी की मांग भी लगातार बढ़ रही है। ऐसे में भविष्य में पानी की कमी से निपटने के…

अमरनगर ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे वाढदिवसाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

नागपूर, उज्वल रोकडे (प्रतिनिधी) : अमरनगर ज्येष्ठ नागरिक मंडळ, अमरनगर यांच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष देविदासजी आगरकर आणि ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान, नागपूरचे सचिव राजूजी मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम…