नाशिक : “पवित्र नाशिक नगरीस माझा नमस्कार!” अशा मराठीतील आपुलकीच्या शब्दांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नाशिककरांची मने जिंकली. भारतीय जनमानसातील आस्था आणि सामाजिक समरसता हाच सिंहस्थ कुंभमेळ्याचा आत्मा असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. भारतीय मूल्यपरंपरेला एका सूत्रात गुंफण्याचे कार्य सिंहस्थ कुंभमेळा करतो, असेही त्या म्हणाल्या. जिल्ह्यातील ६,५०० जनजाती बांधवांच्या सहभागाने पार पडलेल्या विश्वविक्रमी गोदावरी महाआरती सोहळ्यात त्या बोलत होत्या.
नाशिक जिल्ह्यातील ६५० दुर्गम जनजाती गावांमधून आलेल्या ६,५०० बांधवांनी या महाआरती सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचा गौरव केला. सिंहस्थ कुंभपर्वाची प्राचीन परंपरा सम्राट हर्षवर्धन यांच्या काळातील चिनी प्रवासी ह्यू-एन-त्संग यांच्या प्रवासवर्णनातही आढळते, असे त्यांनी नमूद केले.
भगवान श्री त्र्यंबकेश्वर आणि प्रभू रामचंद्र यांच्या तपोभूमीपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या साल्हेर किल्ल्यापर्यंत नाशिकचा इतिहास गौरवशाली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी व कर्मभूमी, चाफेकर बंधूंसारख्या क्रांतिकारकांचा वारसा, दादासाहेब पोतनीस यांच्यासारखे स्वातंत्र्यसैनिक तसेच महात्मा जोतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्राच्या भूमीत घडवलेली सामाजिक क्रांती यामुळे नाशिकचे महत्त्व अद्वितीय असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील आगामी दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासन जनतेची काळजी घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असा विश्वासही राष्ट्रपतींनी व्यक्त केला. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या पवित्र सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
सिंहस्थ हा श्रद्धेचा महासंगम : राज्यपाल जिष्णू देव वर्मा
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी सिंहस्थ कुंभमेळा हा भारतातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक असल्याचे सांगितले. जात, पात, धर्म आणि सामाजिक भेदांच्या पलीकडे जाऊन सर्वांना अध्यात्माच्या धाग्याने जोडणारा हा श्रद्धेचा महासंगम असल्याचे त्यांनी नमूद केले. कुंभमेळा स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक व्हावा यासाठी गोदावरी नदीच्या स्वच्छतेला प्राधान्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सामाजिक संस्थांनीही या कामात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी गोदामाईच्या कृपेने महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन बळीराजाच्या जीवनात सुख-समृद्धी नांदो, अशी प्रार्थना केली.
जनजाती समाजाने सनातन संस्कृती जतन केली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सनातन संस्कृती अनादी आणि अनंत असल्याचे सांगितले. अथांग सागराप्रमाणे असलेल्या या संस्कृतीच्या विविध अभिव्यक्तींचा महासंगम म्हणजे कुंभपर्व होय. महागोदा आरतीसाठी ६,५०० जनजाती बांधव सहभागी झाले असून सनातन संस्कृतीच्या संवर्धनात जनजाती समाजाचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
आगामी सिंहस्थ कुंभपर्व भव्य, दिव्य आणि सुंदर करण्यासोबतच नाशिक व त्र्यंबकेश्वरचा चेहरामोहरा बदलण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. या परिसरातील विकासकामे प्रत्यक्षात साकारत आहेत. शासनाची भूमिका केवळ सुविधा निर्माण करण्याची असून कुंभपर्वाचे खरे मालक साधू-महंत आहेत. शासन-प्रशासनाकडून काही चूक झाल्यास संत-महंतांनी मोठ्या मनाने क्षमा करावी, असे आवाहनही त्यांनी केले. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सहकार्य करणाऱ्या नाशिककरांचे त्यांनी आभार मानले.
१२ कोटी भाविकांच्या स्वागतासाठी राज्य शासन सज्ज : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जगभरातून सुमारे १२ कोटी भाविक येण्याचा अंदाज असून त्यांच्या स्वागतासाठी राज्य शासन सज्ज असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू असून या कामांमुळे परिसराच्या भविष्याला नवी दिशा मिळेल. हा सोहळा स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रामतीर्थ आणि कुशावर्त तीर्थावर धर्मध्वजारोहण होणे हा संपूर्ण नारीशक्तीचा गौरव असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेचे मूर्त स्वरूप या कुंभपर्वातून जगाला पाहायला मिळेल, असेही ते म्हणाले.
कुंभगीत, संकेतस्थळ आणि विशेष टपाल तिकिटांचे विमोचन
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणातर्फे तयार करण्यात आलेल्या अधिकृत कुंभगीताचे आणि संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच नाशिकच्या रामतीर्थ आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर आधारित विशेष टपाल तिकिटांचे विमोचन करण्यात आले. रामचंद्र जायभावे यांनी ही विशेष टपाल तिकिटे राष्ट्रपतींना सुपूर्द केली. या उपक्रमामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याची धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरा राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाली आहे.
सिंहस्थाच्या पूर्वसंध्येला नाशिकच्या नावे दोन जागतिक विक्रम
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्मध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या नावे धार्मिक क्षेत्रातील दोन जागतिक विक्रमांची नोंद झाली आहे. शंखवादनाचा जागतिक विक्रम : २५ तारखेला अमेरिकेतील ३०० शंखवादकांचा विक्रम मोडीत काढत नाशिकमध्ये ५१७ शंखवादकांनी एकत्रित शंखनाद केला. यामुळे नवा जागतिक विक्रम प्रस्थापित झाला. गोदावरी महाआरतीचा जागतिक विक्रम : ६,५०० जनजाती बांधवांच्या सहभागाने पार पडलेल्या भव्य गोदावरी महाआरतीची अधिकृत नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये करण्यात आली. गिनीज बुकचे अधिकारी ऋषीनाथ यांनी यासंदर्भात घोषणा केली.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पणन मंत्री जयकुमार रावल, आदिवासी विकास मंत्री प्रा. अशोक उईके, मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य, जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज, जगद्गुरू वल्लभाचार्य महाराज, विविध आखाड्यांचे साधू-महंत, महापौर हिमगौरी आडके-आहेर, खासदार राजाभाऊ वाजे, भास्कर भगरे, डॉ. शोभा बच्छाव, आमदार सुहास कांदे, गोकुळ गिते, राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज अहिरे, दिलीप बनकर, माणिकराव कोकाटे यांच्यासह विविध प्रशासकीय व राजकीय मान्यवर उपस्थित होते.


