पुणे , राजन शेळके (प्रतिनिधी) : ३२ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या नवव्या दिवशी आयोजित ‘लता युग’ या कार्यक्रमात भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेल्या अजरामर गीतांनी रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. श्री गणेश कला क्रीडा रंगमंदिर येथे सायंकाळी निर्माता, दिग्दर्शक आणि निवेदक संदीप पंचवाटकर यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.
लता मंगेशकर यांनी विविध संगीतकारांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेली असंख्य गाणी आजही रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. संगीतकार शंकर-जयकिशन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, आर. डी. बर्मन, जतिन-ललित, वसंतदेव, रोशन आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेल्या रचनांना लतादीदींनी आपल्या दैवी आवाजाने अजरामर केले. या कार्यक्रमात सादर झालेल्या अनेक गीतांना रसिकांनी वन्स मोअरची दाद दिली.
गुलजार, हसरत जयपुरी, शैलेंद्र, आनंद बक्षी, इंदीवर, प्रदीप, सुरेश भट, राजा मेहंदी आणि असद भोपाली अशा नामवंत गीतकारांच्या रचनांनी कार्यक्रमात रंगत आणली. ‘नाम गुम जाएगा’, ‘आजा आई बहार’, ‘सोला बरस की’, ‘मेघा रे मेघा’, ‘रात का समा’, ‘फूल तुम्हे भेजा है’, ‘तुझसे नाराज नहीं’, ‘तुझे देखा तो ये जाना’, ‘बाहों में चले आओ’, ‘मेहंदीच्या पानावर’, ‘परबत के उस पार’, ‘लग जा गले’, ‘छोटी सी उमर में’, ‘सलाम-ए-इश्क’, ‘दिल दीवाना बिन सजना के’, ‘मन क्यों बहका’, ‘इस मोड़ से जाते हैं’ आणि ‘होंठों पे ऐसी बात’ अशा अनेक लोकप्रिय गीतांना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
‘सलाम-ए-इश्क’ या गाण्यातील दोन कडवी आयोजक आबा बागुल यांनी स्वतः सादर केली. त्यांच्या सादरीकरणालाही प्रेक्षकांनी वन्स मोअरची दाद दिली. प्रत्येक गाण्यामागील वैशिष्ट्ये आणि त्याची पार्श्वभूमी यांचे अभ्यासपूर्ण विवेचन करणाऱ्या संदीप पंचवाटकर यांच्या रसाळ निवेदनाने कार्यक्रमात विशेष रंगत आणली. कार्यक्रमाच्या अखेरीस लतादीदींनी अजरामर केलेले कवी प्रदीप यांचे ‘ए मेरे वतन के लोगो’ हे देशभक्तिपर गीत सादर करण्यात आले. या वेळी उपस्थित सर्व प्रेक्षक आदराने उभे राहिले. या गीताच्या सादरीकरणाने उपस्थितांचे मन हेलावून गेले आणि भावपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक व अध्यक्ष आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, सौ. प्रतिभा पाटील आणि उद्योगपती चांडक यांच्या हस्ते कलावंतांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात गायिका रेशमी मुखर्जी, भाग्यश्री डुंभरे, अनुश्री घोरपडे, सहगायक गफार मोमीन, तबलावादक गोविंद कुडाळकर, ढोलकवादक नागेश भोसेकर, ऑक्टोपॅड वादक संजय खाडे, कीबोर्डवादक संतोष खंडागळे आणि संगीत संयोजनाची जबाबदारी सांभाळणारे सईद खान यांनी सहभाग घेतला. त्यांच्या सादरीकरणाचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले.
‘आपण सारे लता युगात जन्मलो, हे आपले भाग्य आहे,’ असे गौरवोद्गार आबा बागुल यांनी काढत कार्यक्रमाचा समारोप केला. या वेळी घनश्याम सावंत यांनी आभार प्रदर्शन केले. नंदकुमार बानगुडे, रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर, अमित बागुल, हेमंत बागुल, सागर आरोळे आदी मान्यवर उपस्थित होते.


