अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (प्रतिनिधी) : शहरालगत असलेल्या केडगाव येथील जागृत देवस्थान श्री रेणुकामाता मंदिरात आणि बुऱ्हाणनगर येथील तुळजाभवानी मंदिरात अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर विधिवत घटस्थापना करण्यात आली.
अहिल्यानगर शहरासह परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या दोन्ही मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी असते. विशेषतः महिला भाविक नवरात्रात दररोज पायी जाऊन देवीचे दर्शन घेतात. पुरातन आणि जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या या दोन्ही मंदिरांच्या परिसरात नवरात्रोत्सवात यात्रेचे स्वरूप निर्माण होते. नवरात्र काळात देवस्थानच्या वतीने दररोज महापूजा, अभिषेक आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.


