अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रतिनिधी) : अकोले तालुक्यातील कोतूळ गावात विविध भागांत भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्रामस्थांसह सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्ते, गल्लीबोळ, बाजारपेठ तसेच रहिवासी परिसरात कुत्र्यांचे टोळके फिरत असून, त्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गावातील काही मांस विक्रेते शिल्लक राहिलेले मांस, मच्छीचे तुकडे व अन्य अवशेष उघड्यावर टाकत असल्याने त्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांची गर्दी होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अशा प्रकारे उघड्यावर मांसाचे अवशेष टाकल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण होऊन दुर्गंधी तसेच रोगराई पसरण्याची शक्यता असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे. विशेषतः सकाळच्या वेळेस अनेक नागरिक आरोग्यासाठी फिरण्यासाठी घराबाहेर पडतात. मात्र, रस्त्यावर मोठ्या संख्येने भटक्या कुत्र्यांची टोळकी फिरत असल्याने नागरिकांना त्यांचा सामना करावा लागत आहे. कुत्र्यांच्या भीतीमुळे सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे प्रमाणही कमी झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकीस्वारांना या कुत्र्यांचा अधिक त्रास होत असून, कुत्र्यांच्या टोळक्यांमुळे अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून, ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे. भटक्या कुत्र्यांचा मानवीय पद्धतीने बंदोबस्त, निर्बीजीकरण व लसीकरणाची कार्यवाही करण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी मटणाचे अवशेष अथवा कचरा उघड्यावर टाकणाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई करावी. तसेच मटण विक्रेत्यांना मांसाचे अवशेष योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत सूचना द्याव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
याबाबत विजय काळे, ऋषिकेश नागरे, किरण सोनुले आणि गिरीष कोते यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे निवेदन देऊन भटक्या कुत्र्यांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रामपंचायतीने संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.


