अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख) : ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता अहोरात्र धावपळ करून घराघरात प्रकाश पोहोचविणाऱ्या महावितरणच्या ‘जनमित्रा’ला आता बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात स्थान मिळाले आहे. सन २०२६ च्या इयत्ता तिसरीच्या ‘कार्यशिक्षण’ विषयाच्या पाठ्यपुस्तकात ‘परिसरातील व्यक्ती’ या घटकांतर्गत वायरमनचे चित्र समाविष्ट करण्यात आले आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तसेच वादळ, पाऊस आणि आपत्कालीन परिस्थितीत वीज सेवा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी आणि अभियंते अहोरात्र कार्यरत असतात. अनेकदा प्रतिकूल हवामानातही जीवाची पर्वा न करता ते वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतात. त्यांच्या या सेवाभावी कार्याची दखल आता शालेय पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचणार आहे. महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर बालभारतीच्या इयत्ता तिसरीच्या कार्यशिक्षणाच्या पुस्तकात वायरमनचा समावेश करण्यात आला आहे.
या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरात वीज सेवा पुरविणारे कर्मचारी, वायरमन यांच्या कार्याची प्राथमिक माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर विद्युत सुरक्षा, विजेचा योग्य वापर आणि ऊर्जा बचतीबाबत जनजागृती करण्यासही मदत होईल. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ‘जनमित्र’ म्हणून संबोधले जाते. वादळ असो अथवा मुसळधार पाऊस, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिकांच्या तक्रारींना प्रतिसाद देत हे कर्मचारी सेवा बजावत असतात. त्यांच्या या कार्याला शालेय पाठ्यपुस्तकात मिळालेले स्थान हे त्यांच्या निष्ठा, परिश्रम आणि सामाजिक बांधिलकीची दखल असल्याची भावना महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने व्यक्त केली. “वीज सेवा देणाऱ्या प्रकाशदूतांच्या कार्याची ओळख बालवयातच विद्यार्थ्यांना होणे, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. महावितरणच्या प्रत्येक जनमित्राच्या सेवेला पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून मिळालेला हा सन्मान स्वागतार्ह आहे,” अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या वतीने विभागीय सचिव अमोल आभाळे यांनी व्यक्त केली.


