अमरावती , राज माहोरे ( प्रतिनिधी ) : अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावेळी शिक्षकांच्या प्रश्नांपेक्षा उमेदवारांच्या राजकीय नातेसंबंधांचीच अधिक चर्चा रंगत असून, “शिक्षकांचे खरे नेतृत्व की राजकीय घराण्यांचा वारसा?” हा प्रश्न शिक्षक मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांमध्ये विद्यमान आमदार किरण सरनाईक, आमदार राजेश वानखडे यांचे मेहुणे व डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर भोयर, राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या भगिनी डॉ. संगीता शिंदे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे दिलीप कडू, नुटाशी संबंधित डॉ. प्रशांत विघे आणि माजी मंत्री डॉ. हर्षवर्धन देशमुख यांच्या कन्या प्रा. अदिती पोहरे यांची नावे चर्चेत आहेत. विशेष म्हणजे या सहा नावांपैकी बहुतांश उमेदवारांचा शिक्षक संघटना, शिक्षण संस्था, विद्यापीठीय कामकाज किंवा शिक्षक चळवळीशी काही ना काही संबंध असल्याचे दिसून येते. मात्र प्रा. अदिती पोहरे यांच्या नावाची अचानक चर्चा सुरू झाल्याने अनेक शिक्षकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत.
अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा विस्तीर्ण शिक्षक मतदारसंघ, हजारो शिक्षकांच्या समस्या, शाळा, महाविद्यालये, अनुदान, सेवा अटी, भरती, निवृत्तीवेतन, नवीन शैक्षणिक धोरण यांसारख्या विषयांवर अद्याप त्यांची ठोस भूमिका किंवा सक्रिय सहभाग व्यापक स्तरावर समोर आलेला नसल्याची चर्चा शिक्षकांमध्ये सुरू आहे. दरम्यान, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आधीच ठाकरे गटाचे दत्ता लहाने, शिक्षक भारतीचे सुरेश देवकर आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे दिलीप कडू यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र महायुती आणि महाविकास आघाडीने अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नसल्याने राजकीय गणिते अधिक गुंतागुंतीची बनली आहेत.
महायुतीत भाजपकडून चंद्रशेखर भोयर व डॉ. संगीता शिंदे तर शिंदे सेनेकडून विद्यमान आमदार किरण सरनाईक आणि श्रीकांत देशपांडे यांच्यात जोरदार स्पर्धा असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून प्रा. अदिती पोहरे यांचे नाव पुढे आल्याने महाविकास आघाडीतही अस्वस्थता वाढल्याचे संकेत मिळत आहेत. राजकीय निरीक्षकांच्या मते, उमेदवारीवरून नाराज झालेल्या इच्छुकांकडून बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यंदाची निवडणूक बहुरंगी आणि अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
निवडणूक कार्यक्रम
अधिसूचना : २९ सप्टेंबर
नामांकन अर्ज : ६ ऑक्टोबरपर्यंत
छाननी : ७ ऑक्टोबर
माघार : ९ ऑक्टोबर
मतदान : २३ ऑक्टोबर
मतमोजणी : २७ ऑक्टोबर
सध्या मैदानात जाहीर उमेदवार
* दत्तात्रय लहाने — शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
* सुरेश देवकर — शिक्षक भारती
* दिलीप कडू — विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ
भाजप, शिंदे सेना आणि काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अद्याप गुलदस्त्यात आहेत.


