अभियांत्रिकीच्या नव्या पर्वाला ‘दीक्षारंभ’; के. जे. महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

पुणे, राम शेंडे ( प्रतिनिधि ) : अभियांत्रिकी शिक्षणाच्या चार वर्षांच्या प्रवासात विद्यार्थ्यांनी स्पष्ट ध्येय निश्चित करून सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम, शिस्त आणि कौशल्यविकासावर भर द्यावा, असा संदेश के. जे. अभियांत्रिकी महाविद्यालय येथे आयोजित प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या प्रवेशपरिचय व दीक्षारंभ कार्यक्रमात मान्यवरांनी दिला.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील शैक्षणिक व्यवस्था, अध्यापन व परीक्षा पद्धती, उपलब्ध सुविधा, मार्गदर्शन व्यवस्था, करिअरच्या संधी आणि व्यक्तिमत्त्व विकासाची दिशा यांची माहिती करून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी के. जे. शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव जाधव, प्रमुख पाहुणे व सायबर सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष डॉ. हॅरॉल्ड डी’कोस्टा, संकुल कार्यकारी संचालक मेजर जनरल समीर कल्ला, संकुल संचालक डॉ. जयवंत संकपाळ, तांत्रिक संचालक डॉ. अजय फुलंबरकर, विद्यार्थी विकास व कल्याण अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, प्राचार्य डॉ. सुहास खोत यांच्यासह सर्व अभियांत्रिकी शाखांचे विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे डॉ. हॅरॉल्ड डी’कोस्टा यांचा कल्याणराव जाधव यांच्या हस्ते, तर कल्याणराव जाधव यांचा प्राचार्य डॉ. सुहास खोत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. के. जे. शिक्षण संकुलातील संचालकांचा डॉ. सुहास खोत यांच्या हस्ते, तर डॉ. सुहास खोत यांचा प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. प्राजक्ता देशमुख यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. समुपदेशिका योगिता तोडकर आणि पुरंदर माध्यम समूहाचे श्री. प्रदीप जगताप यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. प्राजक्ता देशमुख यांनी विद्यार्थ्यांना प्रथम सत्राची शैक्षणिक रचना, अध्यापन व परीक्षा पद्धती तसेच वर्गशिक्षक आणि मार्गदर्शक शिक्षक प्रणालीची सविस्तर माहिती दिली. महाविद्यालयीन जीवनातील शैक्षणिक शिस्त, नियमित अभ्यास आणि शिक्षकांशी सातत्यपूर्ण संवादाचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

महाविद्यालयाचे प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी प्रा. विनायक उपराटे यांनी विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीच्या चारही वर्षांत अभ्यासाकडे गांभीर्याने पाहून आपल्या ज्ञानात सातत्याने भर घालावी, असे सांगितले. भविष्यातील रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञानाबरोबरच संवादकौशल्य, आत्मविश्वास आणि मुलाखतीला सामोरे जाण्याची क्षमता विकसित करावी, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

प्राचार्य डॉ. सुहास खोत यांनी संकुलातील संचालक, महाविद्यालयातील विभागप्रमुख, कार्यालयीन व ग्रंथालय कर्मचारी तसेच समुपदेशिका योगिता तोडकर यांची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध विविध शैक्षणिक व तांत्रिक सुविधांची माहितीही त्यांनी दिली.

महाविद्यालयातील कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयोगशाळा, विद्युत वाहन प्रयोगशाळा, उद्योजकता व नवउद्योग केंद्र यांसह विविध अत्याधुनिक सुविधांचा विद्यार्थ्यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सुहास खोत यांनी केले. पीएचएन टेक्नॉलॉजी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांसारख्या उद्योगांशी महाविद्यालयाने केलेल्या सामंजस्य करारांमुळे विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख शिक्षणासोबतच प्रत्यक्ष अनुभवाच्या संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

“नव्या पिढीने तंत्रज्ञानाचा योग्य व सकारात्मक वापर करावा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सातत्याने मेहनत केल्यास यश निश्चित साध्य करता येते. मेहनतीला पर्याय नाही; शॉर्टकटने यश मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे,” असे आवाहन डॉ. सुहास खोत यांनी केले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनीही महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रक्रियेत सहभागी व्हावे. पालकांनी वेळोवेळी महाविद्यालयाला भेट देऊन वर्गशिक्षक व मार्गदर्शक शिक्षकांशी संवाद साधावा, असे त्यांनी सांगितले. तसेच एखादा विद्यार्थी भावनिक, वैयक्तिक किंवा शैक्षणिक अडचणीमुळे अस्वस्थ असल्यास त्याने आपल्या मार्गदर्शक शिक्षकांशी मोकळेपणाने संवाद साधावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

के. जे. शिक्षण संकुलाचे कार्यकारी संचालक मेजर जनरल समीर कल्ला यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याची आणि व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करण्यासाठी महाविद्यालयीन जीवनाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा, असे सांगितले. अभियांत्रिकीच्या चार वर्षांच्या शिक्षणप्रवासात विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेचा शंभर टक्के वापर करावा, शिकण्याच्या प्रक्रियेत सातत्य ठेवावे आणि मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, असे त्यांनी नमूद केले. शिस्त, वेळेचे नियोजन आणि जबाबदारीची जाणीव अंगीकारण्याचे आवाहनही त्यांनी केले.

प्रमुख पाहुणे डॉ. हॅरॉल्ड डी’कोस्टा यांनी अभियांत्रिकी जीवनातील प्रवेशपरिचय दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. अभियांत्रिकी शिक्षणाची सुरुवात करताना विद्यार्थ्यांना पुढील चार वर्षांच्या शैक्षणिक प्रवासाची, विविध संधींची आणि अपेक्षांची माहिती मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात नव्या क्षेत्रांसाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.

कल्याणराव जाधव यांनी विद्यार्थ्यांनी जीवनात उत्तुंग यश मिळविण्याचे ध्येय ठेवावे, असे आवाहन केले. जिद्द, कष्ट, चिकाटी, ध्येयासक्ती आणि सातत्य या गुणांच्या बळावर विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्यातील वाटचाल घडवावी, असा संदेश त्यांनी दिला. उपलब्ध संधींचा योग्य उपयोग करून ज्ञान आणि कौशल्यांचा विकास करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील प्रथम वर्षाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कल्याणराव जाधव आणि डॉ. हॅरॉल्ड डी’कोस्टा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सोहम जाधव, आर्या ढोणे, संकेत झोंबडे, पियुष चंगेडिया, कुणाल पिंगळे आणि धनश्री पिंगहाटे या विद्यार्थ्यांचा उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला.

कार्यक्रमानंतर पालकांच्या वतीने मनोगत व्यक्त करण्यात आले. विद्यार्थ्यांना तसेच पालकांना महाविद्यालयाची शैक्षणिक व्यवस्था, उपलब्ध सुविधा, मार्गदर्शन प्रणाली आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिल्याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त करून महाविद्यालयाचे आभार मानले. काही विद्यार्थी व विद्यार्थिनींनीही मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयातील शैक्षणिक सुविधा, ग्रंथालय, प्रात्यक्षिक प्रयोगशाळा आणि वसतिगृहातील सुविधांबाबतचे अनुभव सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विशाल भोई यांनी केले. प्रा. संदिप सहाणे यांनी आभारप्रदर्शन केले. त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…