रामटेक, प्रशांत भोयर (प्रतिनिधी) :
: शितलवाडी, रामटेक येथील ‘स्नेहसदन’ बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत लाडक्या गणरायाचे अत्यंत उत्साही, मंगलमय आणि भक्तीमय वातावरणात आगमन झाले आहे. बाप्पाच्या आगमनाने शाळेचा संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला असून, विशेष बालकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत आहे.
या गणेशोत्सवाच्या १० दिवसांच्या कालावधीत केवळ धार्मिक विधी न करता, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे आणि समाजाला एक नवा सकारात्मक संदेश देणारे विविध स्तुत्य उपक्रम शाळेच्या वतीने राबवले जाणार आहेत. यामध्ये ‘इको क्लब’च्या माध्यमातून विशेष स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जाईल. तसेच मुलांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी आकर्षक रांगोळी स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम
याच सोहळ्याचे औचित्य साधून भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेत विविध विशेष कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांनी साकारलेली ‘मनुष्य रांगोळी’ (Human Chain/Human Rangoli) हे मुख्य आकर्षण असणार आहे. या माध्यमातून देशहिताचा आणि सामाजिक एकतेचा संदेश ही विशेष मुले समाजाला देणार आहेत. स्नेहसदन शाळेतील शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि या विशेष मुलांचा उत्साह यामुळे शाळेत सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजातील प्रत्येक घटकाने या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी, असे आवाहन शाळा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


