परभणी, निलेश कामतीकर ( प्रतिनिधी ) : मराठवाड्यातील व परभणी जिल्ह्यातील पहिल्या एम.एस. नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर तथा ज्येष्ठ समाजसेविका आशाताई दत्तात्रय मगर यांचे आज पहाटे राहत्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८३ वर्षांच्या होत्या.
दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर जिंतूर रस्त्यावरील वैकुंठधाम स्मशानभूमीत आज दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. परभणीचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. दत्तात्रय मगर यांच्या त्या पत्नी, तर डॉ. प्रसाद मगर व सौ. हर्षा माकोडे, सेलू यांच्या मातोश्री होत्या. परभणी जिल्ह्यातील वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रात डॉ. आशाताई मगर यांचे मोठे योगदान होते. अत्यंत शांत, मनमिळावू आणि तळमळीने काम करणाऱ्या डॉ. मगर या विविध संघटना व प्रतिष्ठानांशी संलग्न होत्या.


