अहिल्यानगर,राधेशाम कुलकर्णी (प्रतिनिधी) : सध्याच्या धकाधकीच्या आणि व्यावसायिक युगात माणसामाणसांमधील दुरावा वाढत असताना, रोटरी क्लब अहिल्यानगरच्या वतीने आयोजित ‘स्वर दीपावली’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आपलेपणा, जिव्हाळा आणि माणुसकीचा अनोखा अनुभव देणारा ठरला. संगीताच्या माध्यमातून रोटरी क्लबचे सदस्य आणि त्यांच्या कुटुंबीयांनी एकत्र येत निखळ आनंदाची मैफल रंगवली.
रोटरी क्लब अहिल्यानगरचे अध्यक्ष सुहास क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम दिमाखात संपन्न झाला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात सादरीकरण करणारे सर्व गायक आणि गायिका हे रोटरी क्लबचेच सदस्य होते. या सोहळ्याला लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, रोटरीचे २०२७-२८ चे प्रांतपाल क्षितिज झावरे, माजी प्रांतपाल शिरीष रायते, प्रसिद्ध अभियंता अविनाश कुलकर्णी, अनिल साळुंखे आणि विजय मुळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन आणि संगीताची शिस्तबद्ध तयारी करण्यात ऋतुजा प्रसन्न पाठक यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. गाण्याची आवड असलेल्या नवोदित कलाकारांना सुरात बसवून त्यांच्याकडून उत्तम सादरीकरण करून घेण्याचे काम त्यांनी मेहनतीने केले. तसेच, फर्निचर व्यावसायिक आणि गायक देवदत्त पाऊलबुद्धे यांनी कराओके सिस्टीम आणि संगीत मार्गदर्शनाची जबाबदारी सांभाळली.
नवोदित गायकांच्या सरावासाठी देवदत्त पाऊलबुद्धे आणि ऋतुजा पाठक यांनी दररोज रात्री वेळ दिला. भावनाताई आणि निलेशजी वैकर यांच्या निवासस्थानी सुमारे महिनाभर सराव सुरू होता. यावेळी वैकर दाम्पत्याने कलाकारांचे चहा-पाणी आणि स्वादिष्ट पदार्थ देऊन आपुलकीने आदरातिथ्य केले. या मैफिलीत डॉ. सुधाताई कांकरिया यांनी ताप आणि घसा बसलेला असतानाही ‘अच्युतम केशवम’ आणि ‘देहाची तिजोरी’ ही भक्तिगीते भावपूर्ण स्वरात सादर केली. डॉ. प्रकाश कांकरिया यांनी तरुणपणीची प्रेमकहाणी सांगत उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटवली.
भावनाताई वैकर यांचे ‘भरजरी ग पितांबर’, स्नेहलताई क्षीरसागर यांचे ‘मुझे तुम मिल गये’, अनघाताई राऊत यांचे ‘रुपेरी वाळूत’, राजेश उपाध्ये यांचे ‘सुख के सब साथी’, सुभाष गर्जे यांचे ‘विठू माऊली तू’, मीनलताई संगमकर यांचे ‘यशोमती मैया से’ आणि डॉ. कांकरिया यांचे ‘ए मालिक तेरे बंदे हम’ या गीतांनी मैफिलीला रंगत आणली.
मेहरबाबांचे निस्सीम भक्त नितीन थाडे यांनी सादर केलेले भजन आणि जोशपूर्ण ‘राजा ललकारी’ यामुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. साऊंड सिस्टीमची जबाबदारी सागर चव्हाण यांनी उत्तमरीत्या सांभाळली. तसेच, थाडे सर यांच्या मुलाने स्वतःहून स्वच्छता राखत उत्तम संस्कारांचे दर्शन घडवले. कार्यक्रमाच्या अखेरीस देवदत्त पाऊलबुद्धे आणि ऋतुजा पाठक यांनी सादर केलेले ‘धुंदी कळ्यांना’ आणि सर्व सदस्यांच्या सहभागातून रंगलेला ‘यमन’ यामुळे मैफिलीची रंगत शिगेला पोहोचली.
रोटरी क्लबचे सदस्य वैद्यकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील व्यावसायिक असून, स्वतःचा व्यवसाय आणि संसार सांभाळून स्वेच्छेने समाजासाठी वेळ देतात. रोटरी क्लब ही अपक्ष आणि धर्मनिरपेक्ष संस्था असून, येथे माणुसकी हाच एकमेव धर्म मानला जातो. ‘शाश्वत प्रभाव निर्माण करा!’ (Create Lasting Change) या रोटरीच्या मुख्य घोषवाक्याला अनुसरून या कार्यक्रमाने उपस्थितांच्या मनावर आपुलकीचा ठसा उमटवला, अशी भावना कार्यक्रमाचे साक्षीदार शिवाजी साळवे यांनी व्यक्त केली.


