नांदेड रवींद्र ओंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी २८ वर्षीय आरोपी आदिनाथ जाधव याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घटना समोर आल्यानंतर पीडितेच्या आईने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित बालिकेला वैद्यकीय तपासणीसाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत. अल्पवयीन बालिकांवरील अत्याचाराच्या घटना समाजासाठी गंभीर आणि चिंताजनक बाब ठरत आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि समाजाची सजग भूमिका आवश्यक आहे.


