श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम,राज माहोरे (प्रतिनिधी) : अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या वतीने श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित मौन श्रद्धांजली कार्यक्रमात राज्याच्या विविध भागांतून आलेल्या लाखो गुरुदेव भक्तांनी साश्रुनयनांनी श्रद्धांजली अर्पण केली. दुपारी ठीक ४ वाजून ५८ मिनिटांनी लाखो भाविकांनी एकाचवेळी हात जोडून राष्ट्रसंतांना मौन श्रद्धांजली अर्पण केली. संपूर्ण भारतात संत-महात्म्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी लाखो भाविक एकाचवेळी शिस्तबद्ध पद्धतीने उपस्थित राहण्याचा हा अनोखा कार्यक्रम असल्याचे सांगण्यात आले. मानवतादिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाच्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे महानिर्वाण मराठी पंचांगानुसार अश्विन वद्य पंचमीला, शुक्रवार ११ ऑक्टोबर १९६८ रोजी सायंकाळी ४ वाजून ५८ मिनिटांनी झाले होते. तेव्हापासून त्यांच्या विचारांवर श्रद्धा असणारे सर्व धर्मपंथातील गुरुदेवप्रेमी आणि भाविक दरवर्षी या दिवशी गुरुकुंज आश्रमात येऊन श्रद्धांजली अर्पण करतात. मागील ५७ वर्षांपासून हा सोहळा अखंड सुरू आहे. ‘मज वेडची गुरुकुंजाचे। आवडतो मज कण कण तिथला।’ या राष्ट्रसंतांच्या संदेशाने प्रेरित होऊन राज्याच्या विविध भागांतून पालख्या, दिंड्या आणि पताका घेऊन लाखो भाविक आश्रमात दाखल झाले. ‘श्रीगुरुदेव की जय’, ‘भारत माता की जय’ अशा जयघोषासह खंजिरी भजन, टाळ-मृदंग आणि हरिनामाच्या गजराने परिसर भक्तिमय झाला होता.
मौन श्रद्धांजली कार्यक्रमातून राष्ट्रसंतांच्या जीवनकार्याची आणि मानवतेच्या संदेशाची माहिती शब्द व सुरांच्या माध्यमातून उपस्थितांना देण्यात आली. सामुदायिक ध्यान आणि प्रार्थनेद्वारे मानवतेचा संदेश देणाऱ्या या महान संतांच्या विचारांची ज्योत तेवत ठेवणे आणि भाविकांना सत्कार्याची प्रेरणा देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मुख्य कार्यक्रमापूर्वी महाद्वारावरील घंटानाद करण्यात आला. त्यानंतर मुख्य मंडपात शंखनाद झाला. दुपारी ३ वाजता ‘गुरुदेव हमारा प्यारा’ या अर्चना गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी ‘तुम बिन कौन है? अब नाथ तारलो’, ‘हम भारत की शान है’, ‘सच्चे सेवक बनेंगे हम’ आणि ‘जन्मोजन्मी हेची देई। विठोबाई माझे आई’ यांसारख्या भजनांचे सादरीकरण करण्यात आले. सुमारे दोन तास लाखो भाविक ध्यानस्थ बसून राष्ट्रसंतांच्या विश्वव्यापक कार्याचे स्मरण करीत होते.
महाद्वारावरील विशाल घंटेचा निनाद होताच ठीक ४ वाजून ५८ मिनिटांनी लाखो गुरुदेव भक्तांनी शिस्तबद्ध पद्धतीने राष्ट्रसंतांच्या महासमाधीस्थळाच्या दिशेने हात जोडून मौन श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर राष्ट्रवंदना आणि ‘आरती राष्ट्रसंता’ या आरतीचे सादरीकरण करण्यात आले. जागतिक स्तरावर वाढत असलेला धर्मवाद, हिंसाचार आणि मानवतेसमोरील आव्हाने लक्षात घेता या पुण्यतिथी महोत्सवात सर्वधर्मीय भाविकांनी समानता आणि मानवतेचा झेंडा उंचावण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. सामुदायिक प्रार्थनेच्या माध्यमातून जागतिक शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन आणि ख्रिश्चन धर्मांच्या धर्मगुरूंनी आपापल्या धर्मानुसार प्रार्थना केली.
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी काही वेळासाठी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली. तसेच यात्रेतील दुकाने आणि ध्वनिक्षेपक काही काळासाठी बंद ठेवण्यात आले. त्यामुळे परिसरात निरव शांतता पसरली होती. या शांत वातावरणात अत्यंत शिस्तबद्ध आणि भावपूर्ण पद्धतीने मौन श्रद्धांजलीचा सोहळा पार पडला. यावेळी श्रीगुरुदेव सेवामंडळाच्या अध्यक्षा पुष्पा बोंडे, संचालक कीर्तीकुमार भांगडिया, सर्वाधिकारी प्रकाश वाघ, उपसर्वाधिकारी बाबाराव पाटील, सरचिटणीस जनार्दन बोथे, प्रचारप्रमुख गोपाल कडू, सेवामंडळाचे राज्यातील आजीवन व जीवन शाखाप्रमुख, प्रचारक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच खासदार बळवंत वानखडे, माजी खासदार नवनीत राणा, आमदार राजेश वानखडे, माजी आमदार यशोमती ठाकूर, नाना महाराज, ॲड. सचिन देव, रामप्रियाजी, विजयादेवी, आरती वानखडे आणि प्रहारचे संजय देशमुख यांच्यासह धार्मिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन आध्यात्मिक विभागप्रमुख डॉ. राजाराम बोथे यांनी केले.


