‘श्रीगणेशा आरोग्याचा!’ उपक्रमातून अमरावतीत आरोग्याची लोकचळवळ

गणेशोत्सव मंडळांच्या सहभागातून आरोग्य शिबिरे; नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचा संकल्प

अमरावती, राज माहोरे ( प्रतिनिधी ) : गणरायाच्या आगमनासोबतच समाजामध्ये आरोग्याचा जागर करण्याच्या उद्देशाने ‘श्रीगणेश आरोग्याचा’ हा अभिनव उपक्रम अमरावती जिल्ह्यात व्यापक स्तरावर राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांच्या समन्वयाने हा उपक्रम लोकचळवळीचे स्वरूप घेणार आहे.

माननीय सचिवालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात ‘श्रीगणेश आरोग्याचा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याच धर्तीवर अमरावती जिल्ह्यातही गणेशोत्सवाच्या माध्यमातून ‘आरोग्य सर्वांसाठी’ हा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालील सर्व आरोग्य संस्था, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अधिपत्याखालील सर्व आरोग्य संस्था, महानगरपालिका आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य संस्था, धर्मादाय संस्थांतर्गत नोंदणीकृत रुग्णालये तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी व आयुष्मान भारत योजनेशी संलग्न रुग्णालये सक्रियपणे सहभागी होणार आहेत.

गणेशोत्सव मंडळांच्या सहकार्याने आरोग्य शिबिरे

जिल्ह्यातील विविध गणेशोत्सव मंडळांशी समन्वय साधून त्यांच्या कार्यक्षेत्रात आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांमध्ये नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी, विविध आजारांचे प्राथमिक निदान, आरोग्यविषयक मार्गदर्शन तसेच पात्र नागरिकांना विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती देण्यात येणार आहे. या माध्यमातून आरोग्यसेवा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविण्यासोबतच आजारांचे वेळेवर निदान आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेबाबत जनजागृती करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नियोजनाला गती

माननीय निवासी जिल्हाधिकारी श्री. संतोष काकडे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबंधित अधिकारी तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘श्रीगणेश आरोग्याचा’ उपक्रमाबाबत आवश्यक सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक संबंधित आरोग्य संस्थेने आपल्या कार्यक्षेत्रातील आरोग्य शिबिरांचे नियोजन करून त्याचा आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

“हा केवळ शिबिरांचा उपक्रम नाही, तर आरोग्याची लोकचळवळ व्हावी”

याबाबत बोलताना माननीय जिल्हाधिकारी श्री. आशिष येरेकर म्हणाले, “संपूर्ण राज्यात ज्या उत्साहाने आणि भावनेने ‘श्रीगणेश आरोग्याचा’ हा उपक्रम राबविला जात आहे, त्याच उत्साहाने अमरावती जिल्ह्यातही हा उपक्रम व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व संबंधित आरोग्य संस्थांना या उपक्रमात सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव मंडळांच्या सहकार्याने विविध ठिकाणी आरोग्य शिबिरे आयोजित करून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा केवळ आरोग्य शिबिरांचा उपक्रम न राहता, नागरिकांच्या सहभागातून उभी राहणारी ‘आरोग्याची लोकचळवळ’ म्हणून हा उपक्रम पुढे यावा, हा आमचा संकल्प आहे.”

‘श्रीगणेश आरोग्याचा’ या उपक्रमाच्या माध्यमातून गणरायाच्या भक्तीसोबत आरोग्याची जाणीव, तपासणीची सवय आणि निरोगी जीवनाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. नागरिकांनी आपल्या परिसरातील आरोग्य शिबिरांमध्ये सहभागी होऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे आणि पात्रतेनुसार उपलब्ध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

गणरायाच्या उत्सवातून आरोग्याचा जागर!

‘श्रीगणेशा आरोग्याचा!’ — निरोगी अमरावतीसाठी एक पाऊल, आरोग्याच्या लोकचळवळीसाठी एक संकल्प!

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

हरे रामा हरे कृष्णाच्या तालावर थिरकले नागपूरकर!

नागपूर : डीजेचा दणदणाट नाही, फिल्मी गाण्यांचा जल्लोष नाही… त्याऐवजी ‘हरे रामा हरे कृष्णा’च्या भक्तिमय गजरात थिरकले नागपूरकर! तिरंगा चौकात विवेकानंद जनजागृती समितीतर्फे आयोजित करण्यात आलेली नागपूर शहरातील पहिली अध्यात्मिक…

मराठवाडा जनविकास संघ व गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने वृक्षारोपण

भंडारा, प्रशांत जाधव ( ब्युरो चीफ ) : भंडारा डोंगर-जांभवडे, इंदोरी येथे मराठवाडा जनविकास संघ व गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने १ हजार देशी वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कडुलिंब,…