बीड : चायनीज पदार्थांची चव चाखण्यासाठी गर्दी होणाऱ्या एका सेंटरवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकत परवान्याशिवाय सुरू असलेले चायनीज सेंटर बंद केले आहे. या कारवाईमुळे परिसरातील खाद्यविक्रेत्यांमध्येही खळबळ उडाली आहे.
अंबाजोगाई शहरातील बाजार परिसरात असलेल्या तवक्कल चायनीज सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सोमवारी (३ ऑगस्ट) सायंकाळी तपासणी केली. अन्न सुरक्षा अधिकारी अ. दि. नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान संबंधित सेंटरकडे आवश्यक अन्न परवाना नसल्याचे तसेच खाद्यपदार्थ तयार करण्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आली. स्वयंपाकघरातील स्वच्छतेचे नियम पाळले जात नसल्याने प्रशासनाने तातडीने दुकान बंद करण्याचे आदेश दिले. कारवाईदरम्यान पथकाने चायनीज पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे कच्चे साहित्य आणि काही खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. प्रयोगशाळेतील अहवालानंतर संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत आवश्यक परवाना मिळेपर्यंत हे सेंटर बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.दरम्यान, अंबाजोगाई आणि केज परिसरातून निकृष्ट दर्जाच्या आणि अस्वच्छ अन्न विक्रीबाबत प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे.नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट करत प्रशासनाने अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे सांगितले आहे.


