मुंबई : शिक्षण क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक दूरदृष्टी असलेले नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, “कार्यतपस्वी नेतृत्व हरपले” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
शिक्षण, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात डॉ. डी. वाय. पाटील यांनी दिलेले योगदान अतुलनीय असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले. बिहार, पश्चिम बंगाल आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल असलेल्या डॉ. पाटील यांच्या निधनाने सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, डॉ. पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षणाच्या प्रसारासाठी समर्पित केले. एका छोट्या शाळेपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज शेकडो शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचला. वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषधनिर्माण, आर्किटेक्चर यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी उभारलेल्या संस्थांनी महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला नवी ओळख मिळवून दिली. शिक्षणासोबतच आरोग्यसेवा, सहकार आणि समाजकारणातही डॉ. पाटील यांनी महत्त्वपूर्ण काम केले. दोन वेळा आमदार म्हणून त्यांनी राजकीय क्षेत्रातही योगदान दिले. मात्र, त्यांची खरी ओळख ही शिक्षणसेवक आणि समाजहितासाठी काम करणारे व्यक्तिमत्त्व अशीच राहिली.
डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय स्टेडियमसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांमधून त्यांची दूरदृष्टी दिसून येते. सहकार, सांस्कृतिक, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील, असे मुख्यमंत्री म्हणाले. “अहंकार म्हणजे जीवनाचा मृत्यू; तर अहंकाराचा मृत्यू म्हणजेच खरे जीवन” हा डॉ. पाटील यांचा विचार त्यांच्या साधेपणाचे आणि समाजसेवेच्या भावनेचे प्रतीक होता, असेही फडणवीस यांनी नमूद केले. डॉ. डी. वाय. पाटील यांचे कार्य, शिक्षणाची परंपरा आणि समाजहिताची मूल्ये पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहतील, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.


