पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चारही धरणे पाण्याने तुडुंब भरली आहेत. पुणे शहर आणि धरण परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ झाली असून सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत धरण साखळीत २८.९८ टीएमसी म्हणजेच ९९.४३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
खडकवासला, पानशेत आणि वरसगाव ही तीनही धरणे १०० टक्के भरली आहेत. तर टेमघर धरणातही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाला आहे. सध्या पानशेत धरणात १०.६५ टीएमसी, वरसगावमध्ये १२.८२ टीएमसी, खडकवासला धरणात १.९७ टीएमसी आणि टेमघरमध्ये ३.५४ टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी खडकवासला धरण साखळीत २५.७६ टीएमसी म्हणजेच ८८.३८ टक्के पाणीसाठा होता. यंदा तुलनेत सुमारे ३ टीएमसीने अधिक पाणी जमा झाले आहे. त्यामुळे पुणेकरांना आगामी काळातील पाणीपुरवठ्याबाबत मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या सांडव्यावरून २९ हजार ११७ क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात असून आतापर्यंत धरणातून ६.५५ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


