नांदेड, ( जिल्हा प्रतिनिधी ) : विंड्स प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान यंत्र बसवण्याची प्रक्रिया नांदेड जिल्ह्यात अत्यंत संथ गतीने सुरू असल्याबाबत नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना पत्र पाठवून त्यांचे लक्ष वेधले होते. या पत्राची कृषिमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घेतली असून, महाराष्ट्रातील ही प्रक्रिया जलद गतीने राबवण्याचे निर्देश राज्य शासनाला दिले आहेत.
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे आणि फळबागांचे होणारे नुकसान याची योग्य भरपाई मिळावी, यासाठी खा. रवींद्र चव्हाण यांनी महत्त्वपूर्ण पाठपुरावा केला आहे. वातावरणातील बदलानंतर उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींमुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. मात्र, ग्रामपंचायत स्तरावर हवामान यंत्रे उपलब्ध नसल्याने या बदलांची अधिकृत व योग्य नोंद होत नाही. याचा गैरफायदा घेऊन पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांना हवामान आधारित पीकविम्याचा लाभ देताना तांत्रिक अडचणी निर्माण करतात. ही गंभीर बाब रवींद्र चव्हाण यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या निदर्शनास आणून दिली होती. खासदार रवींद्र चव्हाण यांच्या पत्राला उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्र्यांनी या मागणीची योग्य ती दखल घेण्यात आल्याचे कळवले आहे.


