पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : शरीर आणि मनाचे संतुलन राखल्यास दीर्घायुष्य प्राप्त होते. मात्र, हे संतुलन बिघडल्यास आयुष्यात अशांतता निर्माण होऊन अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शरीर, मन आणि आत्म्याचे संतुलन कसे राखावे, याचे मार्गदर्शन रमेश खाडे लिखित ‘कर्मेंद्रिया : शरीर, मन और आत्मा का संतुलित विज्ञान’ या पुस्तकातून मिळेल, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या शिरूर केंद्राच्या संचालिका राजयोगिनी शकुंतला दिदी यांनी केले.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या शिवाजीनगर केंद्रातर्फे रमेश खाडे लिखित ‘कर्मेंद्रिया : शरीर, मन और आत्मा का संतुलित विज्ञान’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (दि. १) राजयोगिनी शकुंतला दिदी यांच्या हस्ते झाले. सदाशिव पेठेतील अक्षरवेल सभागृहात आयोजित कार्यक्रमाला कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष सचिन आपटे, टायनी इंडस्ट्रिअल असोसिएशनचे अध्यक्ष शांताराम जाधव, रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, डॉ. राम खर्चे आणि शारदा दिदी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुस्तक लेखनाविषयी बोलताना रमेश खाडे म्हणाले, प्रत्येकजण आज स्वसंवाद हरवून बसला आहे. स्वसंवादासोबतच मानसिक संतुलन साधता यावे, यासाठी पुस्तकाच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे. ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, पुस्तकाच्या माध्यमातून रमेश खाडे यांनी जीवनमूल्यांचा अर्थ सोप्या भाषेत मांडला आहे. बोधपर कथांमधून वाचकांना जीवनाचे सार समजून घेता येईल. सचिन आपटे म्हणाले, संस्कारांची जपणूक करणे, चुकीच्या सवयी दूर सारणे आणि स्वतःच्या विचारांनुसार कृती करणे यामुळे आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतात. यावेळी शांताराम जाधव आणि डॉ. राम खर्चे यांनीही मनोगत व्यक्त केले. शारदा दिदी यांनी सूत्रसंचालन केले.


