गडकरींमुळे दिव्यांगांच्या आयुष्यात स्वाभिमानाची नवी पहाट!

कृत्रिम पायांमुळे ४० दिव्यांगांना मिळाला नवा आधार; सीआरसी ठरतेय हजारो दिव्यांगांसाठी आशेचा किरण

नागपूर : दुसऱ्याच्या आधाराने चालावे लागणे, दैनंदिन कामांसाठी कुटुंबीयांवर अवलंबून राहणे आणि समाजात वावरताना न्यूनगंडाची भावना निर्माण होणे, अशा अनेक आव्हानांचा दिव्यांगांना सामना करावा लागतो. मात्र, कृत्रिम पाय बसवून पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळते, तेव्हा त्यांच्या आयुष्यात नव्या आत्मविश्वासाचा जन्म होतो. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारामुळे अनेक दिव्यांगांच्या आयुष्यात स्वाभिमानाची नवी पहाट उजाडली आहे. शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी आयोजित कार्यक्रमातून याची पुन्हा एकदा प्रचिती आली.

महाल येथील गडकरी वाडा येथे ४० दिव्यांगांना नितीन गडकरी यांच्या हस्ते कृत्रिम पायांचे वितरण करण्यात आले. कृत्रिम पाय बसवल्यानंतर आत्मविश्वासाने चालून दाखविणाऱ्या दिव्यांगांना पाहून गडकरीही भारावून गेले. दिव्यांगांच्या आयुष्यात आनंद पेरण्यासाठी गेल्या २५ वर्षांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून काम करीत असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला.

कृत्रिम पाय बसवल्यानंतर स्वतःच्या पायांवर चालता येण्याचा आनंद, पुन्हा काम करण्याची क्षमता आणि कुटुंबाचा आधार बनण्याची उमेद दिव्यांगांना मिळते. नागपुरातील दिव्यांगजन सशक्तीकरण केंद्र अर्थात सीआरसी आज हजारो दिव्यांगांच्या आयुष्यात असाच सकारात्मक बदल घडवत आहे. नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून २०१५ मध्ये नागपुरात स्थापन झालेले सीआरसी दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा आधार बनले आहे. आतापर्यंत सहा लाखांहून अधिक दिव्यांग आणि अन्य लाभार्थ्यांनी या केंद्राच्या विविध विशेष सेवांचा लाभ घेतला आहे.

गडकरी यांच्या पुढाकाराने आयोजित विविध दिव्यांग सहाय्य शिबिरांमधून आतापर्यंत ३० हजार ८४० दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना जवळपास ४२ कोटी रुपयांची सहायक उपकरणे वितरित करण्यात आली आहेत. सप्टेंबर २०२३ पासून आतापर्यंत १९ हजार ८९ लाभार्थ्यांना १६ कोटी ५५ लाख रुपये किमतीची ८४ हजार ५६६ सहायक उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या उपकरणांमुळे अनेकांना दैनंदिन जीवनातील अडचणींवर मात करणे शक्य झाले आहे. इतरांच्या मदतीने चालणारी व्यक्ती जेव्हा स्वतःच्या पायांवर उभी राहते, तेव्हा तिच्यासाठी तो पुनर्जन्मच असतो, अशी भावना गडकरी यांनी व्यक्त केली.

दिव्यांगांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने कृत्रिम अवयव निर्मिती केंद्राची भूमिका विशेष महत्त्वाची ठरत आहे. गडकरी यांच्या खासदार निधीतून हे केंद्र कार्यरत असून, आतापर्यंत १९० हून अधिक दिव्यांगांना कृत्रिम अवयव उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पाय गमावलेल्या व्यक्तींना पुन्हा चालण्याची संधी देण्याबरोबरच त्यांच्या आयुष्यातील हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून देण्याचे काम या केंद्रातून होत आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने दिव्यांगांच्या गरजेनुसार कृत्रिम अवयव उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. ALIMCO च्या सहकार्याने आधुनिक थ्रीडी प्रिंटेड कृत्रिम अवयवांसाठी तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीचा लाभ दिव्यांगांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. याशिवाय ६७ लाख रुपये किमतीची अत्याधुनिक मोबिलिटी उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामुळे हालचालींमध्ये अडचणी असलेल्या व्यक्तींना अधिक सुलभतेने आणि आत्मविश्वासाने जीवन जगता येत आहे.

दिव्यांगांना दयेची नव्हे, तर संधीची गरज आहे, हा विचार प्रत्यक्ष कृतीतून पुढे नेण्याचे काम नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात होत आहे, याबद्दल सीआरसीचे प्रमुख प्रफुल्ल शिंदे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी नितीन गडकरी यांचे सहायक खासगी सचिव डॉ. प्रवीण भालेराव यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अमरनगर ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे वाढदिवसाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

नागपूर, उज्वल रोकडे (प्रतिनिधी) : अमरनगर ज्येष्ठ नागरिक मंडळ, अमरनगर यांच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष देविदासजी आगरकर आणि ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान, नागपूरचे सचिव राजूजी मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम…

शरीर आणि मनाचे संतुलन बिघडल्यास आयुष्यात अशांतता : शकुंतला दिदी

पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : शरीर आणि मनाचे संतुलन राखल्यास दीर्घायुष्य प्राप्त होते. मात्र, हे संतुलन बिघडल्यास आयुष्यात अशांतता निर्माण होऊन अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शरीर, मन आणि आत्म्याचे…