पुणे , आशिष औंढेकर ( प्रमुख पश्चिम महाराष्ट्र ) : कामाच्या ठिकाणी इलेक्ट्रिकचे काम सुरू असताना अचानक शॉर्ट सर्किट होऊन मोठा ब्लास्ट झाला. या ब्लास्टमधून उडालेले मेटलचे कण थेट डोळ्यात जाऊन घुसले. चेहऱ्यावरही भाजल्याच्या जखमा झाल्या. काही क्षणांपूर्वी व्यवस्थित दिसणाऱ्या ३५ वर्षीय फोरमॅनच्या डोळ्यांसमोर अचानक अंधार पसरला. मात्र, सहकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत त्यांना तातडीने पुण्यातील डॉ. दूधभाते नेत्रालय व रेटिना सेंटर येथे दाखल केले. डॉक्टरांनी त्वरित उपचार सुरू केल्यानंतर दृष्टीत आशादायक सुधारणा होऊ लागली.
ही घटना पुण्यातील एका नामांकित इंजिनीअरिंग कंपनीमध्ये इलेक्ट्रिकचे काम करताना घडली. ३५ वर्षीय रुग्ण फोरमॅन म्हणून काम करतात. काम सुरू असतानाच अचानक शॉर्ट सर्किट होऊन ब्लास्ट झाला. ब्लास्टची तीव्रता एवढी होती की, त्यातून उडालेले मेटलचे कण रुग्णाच्या डोळ्यात गेले. डोळ्यांसोबत चेहऱ्यालाही भाजल्याची दुखापत झाली. अपघातानंतरची परिस्थिती अत्यंत चिंताजनक होती. मेटलचे कण डोळ्यात गेल्यामुळे रुग्णाला काहीच दिसत नव्हते. वेदना आणि दुखापतीमुळे डोळे उघडणेही कठीण झाले होते. अशा परिस्थितीत वेळ न दवडता रुग्णाच्या सहकाऱ्यांनी त्यांना डॉ. दूधभाते नेत्रालयात आणले. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांनी तत्काळ रुग्णाची तपासणी केली. डोळ्याची दुखापत गंभीर असल्याचे लक्षात घेऊन प्राथमिक उपचारांना लगेच सुरुवात करण्यात आली. रुग्णाला आयवॉश देण्यात आला आणि आवश्यक डोळ्यांचे ड्रॉप्स सुरू करण्यात आले. उपचारानंतर रुग्णाला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले.
उपचारांचा परिणाम दुसऱ्याच दिवशी दिसून आला. अपघातानंतर काहीच दिसत नसलेल्या रुग्णाला दुसऱ्या दिवशी साधारण ३० ते ४० टक्के दृष्टी जाणवू लागली. त्यानंतरच्या उपचारांदरम्यान दृष्टीमध्ये हळूहळू सुधारणा होत गेली. तिसऱ्या आणि चौथ्या दिवसापर्यंत दृष्टीत लक्षणीय फरक जाणवू लागला. पुढील उपचार आणि वैद्यकीय देखरेखीनंतर रुग्णाची दृष्टी जवळपास ९० टक्क्यांपर्यंत सुधारल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. डोळ्याला झालेली दुखापत कितीही गंभीर असली तरी अपघातानंतर तातडीने योग्य उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. विशेषतः इलेक्ट्रिक काम, वेल्डिंग, मशीनरी किंवा औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांना अशा प्रकारच्या अपघातांचा धोका असतो. अशा वेळी डोळा चोळणे, स्वतःहून मेटलचा कण काढण्याचा प्रयत्न करणे किंवा घरगुती उपाय करून उपचारास विलंब करणे टाळणे आवश्यक आहे. शक्य तितक्या लवकर नेत्रतज्ज्ञांकडे जाणे गरजेचे आहे. या रुग्णाच्या बाबतीत सहकाऱ्यांनी वेळ न दवडता रुग्णालयात आणल्याने तातडीने उपचार सुरू करता आले आणि दृष्टीत सुधारणा होण्यास मदत झाली.
डॉ. दूधभाते नेत्रालय व रेटिना सेंटरच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, डोळ्याला इजा, भाजणे किंवा अपघात झाल्यास घरगुती उपचारांवर वेळ न घालवता तातडीने नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. डोळ्यांच्या दुखापतीमध्ये प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. योग्य वेळी घेतलेला निर्णय दृष्टी वाचविण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.


