शिव-शंभू विचारांचा गगनभेदी निनाद; पिंपरी-चिंचवडमध्ये ढोल-ताशांचा विश्वविक्रम

‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ला ४ हजार ११२ ढोल-ताशांची ऐतिहासिक मानवंदना; तीन ठिकाणी एकाचवेळी वादन

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ला हजारो ढोल-ताशांच्या गजरात रविवारी (दि. ४ ऑक्टोबर २०२६) ऐतिहासिक मानवंदना देण्यात आली. पाच मिनिटांचे शिस्तबद्ध सामूहिक वादन करत ४ हजार ११२ ढोल-ताशांच्या वादनाचा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात आला. या विक्रमाची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाल्याची माहिती आयोजकांनी दिली.

हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड आणि ढोल-ताशा महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्रभरातील ढोल-ताशा पथकांनी सहभाग घेतला. मोशी, स्पाईन रोड आणि वाघेश्वर मंदिर, चऱ्होली या तीन ठिकाणी एकाचवेळी वादन करण्यात आले. यापूर्वी २ हजार ६५० ढोल-ताशांच्या वादनाचा विश्वविक्रम होता. तो विक्रम मोडत पिंपरी-चिंचवडमध्ये ४ हजार ११२ ढोल-ताशांच्या वादनाचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात आला. विश्वविक्रमाच्या प्रयत्नासाठी वादकांना तीन संधी देण्यात आल्या होत्या. सलग पाच मिनिटे एकसंध आणि शिस्तबद्ध वादन करणे हे या प्रयत्नाचे प्रमुख उद्दिष्ट होते. वादकांनी ठेक्यातील सातत्य, समन्वय आणि शिस्त राखत हा विक्रम पूर्ण केला.

शिवशंभो गर्जना, मर्दानी खेळांनी रंगला सोहळा

कार्यक्रमाची सुरुवात स्वागत व प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर ‘शिवशंभो गर्जना’, गोमाता सन्मान आवाहन अभियान आणि मर्दानी खेळांचे सादरीकरण झाले. गिनीज रेकॉर्डच्या तयारीसाठी ढोल-ताशा पथकांची मांडणी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा शिवशंभो गर्जना आणि १११ शंखांचा सामूहिक शंखनाद करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली.

शाहीर चंद्रकांत माने यांचे शाहिरी सादरीकरण, विशेष कविता, शिवशंभूगर्जना आणि शाहीर खुपिरे यांचे सादरीकरण झाले. ढोल-ताशा महासंघाच्या वतीने मनोगत व्यक्त करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी नशामुक्त भारताची सामुदायिक प्रतिज्ञा घेतली. आमदार महेश लांडगे यांनी संबोधन करत संपूर्ण ‘वंदे मातरम्‌’च्या सामूहिक गायनाचे आवाहन केले. त्यानंतर गिनीज रेकॉर्डबाबत माहिती देण्यात आली आणि सामूहिक ढोल-ताशा सेलिब्रेशन झाले. शाहीर खुपिरे यांनी धनगर ओव्या सादर केल्या.

शिव-शंभूंच्या जयघोषाने परिसर दुमदुमला

‘हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय’, ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्‌’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. सोहळ्यात भारतमातेची रंगावलीही रेखाटण्यात आली होती. ढोल-ताशांचा गगनभेदी निनाद, हजारो वादकांची शिस्त आणि पथकांचा समन्वय यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

१२८ मीटरच्या धर्मध्वजालाही मानवंदना

‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’सोबत उभारण्यात येत असलेल्या १२८ मीटर उंच भगव्या धर्मध्वजाच्या गौरवार्थही मानवंदना देण्यात आली. १११ शंखांचा सामूहिक शंखनाद आणि ‘शिवशंभो गर्जना’ या सांगीतिक कार्यक्रमातून शिव-शंभूंच्या विचारांचा आणि पराक्रमाचा जागर करण्यात आला.

गोमाता सन्मान आणि नशामुक्तीचा संदेश

सोहळ्याच्या निमित्ताने ‘गोमाता सन्मान अभियान’विषयी जनजागृती करण्यात आली. ‘नशामुक्त भारत अभियान’अंतर्गत उपस्थितांनी सामूहिक प्रतिज्ञा घेतली. स्वतः व्यसनमुक्त राहण्याबरोबरच कुटुंब आणि समाजात व्यसनमुक्तीबाबत जागृती करण्याचा संकल्प करण्यात आला. संपूर्ण ‘वंदे मातरम्‌’च्या सामूहिक गायनातून मातृभूमीला स्वरांची मानवंदना अर्पण करण्यात आली. गतवर्षीच्या मानवंदनेची प्रेरणा घेत यंदा अधिक व्यापक सहभागातून विश्वविक्रम साकारण्यात आला. समारोपात उपस्थितांचे आभार मानण्यात आले. पुढील वर्षी रविवार, १९ सप्टेंबर २०२७ रोजी याच ठिकाणी हा कार्यक्रम नव्या उत्साहात आयोजित करण्याचा संकल्प करण्यात आला.

“धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ला हजारो ढोल-ताशांच्या निनादातून अर्पण केलेली ही मानवंदना म्हणजे महाराष्ट्राच्या शौर्य, संस्कृती आणि एकजुटीचा अभिमानास्पद आविष्कार आहे. वादकांची शिस्त, पथकांचा समन्वय आणि शिव-शंभूप्रेमींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे विश्वविक्रमाचा संकल्प साकार झाला. या यशाचे खरे मानकरी सर्व वादक, पथकप्रमुख, स्वयंसेवक, सहकारी आणि संस्कृतीप्रेमी नागरिक आहेत. शिव-शंभूंच्या विचारांची प्रेरणा घेऊन सांस्कृतिक वारसा जपण्यासोबतच व्यसनमुक्त आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक समाज घडविण्यासाठी आपण एकत्र काम करूया.”

— महेश लांडगे, आमदार तथा अध्यक्ष, हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

नगर-मनमाड महामार्गावरील राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार!

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर ते नांदगाव शिंगवे दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून निर्माण झालेल्या भीषण वाहतूक कोंडीची माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रत्यक्ष…

रतन टाटा साहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त भटक्या श्वानांसाठी मोफत लसीकरण मोहीम

प्रशांत जाधव (ब्युरो चीफ) :  स्वर्गीय रतनजी टाटा साहेबांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त टाटा मोटर्स विंगर परिवार आणि आधार समाजसेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भटक्या व पाळीव प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित…