पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : आंबेगाव पठार येथील चिंतामणी ज्ञानपीठाजवळ नवले पूल ते कात्रजला जोडणारा रस्ता नव्याने करण्यात आला आहे. या रस्त्यावरील तीव्र उतार काही प्रमाणात कमी करण्यात आला असला, तरी परिसरातील नागरिकांना अद्यापही वाहतुकीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
नवले पूल ते कात्रज महामार्गाला जोडणाऱ्या मार्गावरून आंबेगाव पठारकडे जाणाऱ्या रस्त्याची नव्याने कामे करण्यात आली. मात्र, रस्ता सुधारल्यानंतरही वाहनधारकांना चढ-उतार करताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
कात्रजकडून नवले पूल, महामार्ग तसेच बायपासच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. त्यामुळे अनेकदा या परिसरात वाहतुकीचा बोजवारा उडताना दिसून येतो. दररोजच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, या समस्येतून कधी सुटका होणार आणि हा मार्ग कधी सुरळीत होणार, याकडे आंबेगाव पठार परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


