नांदेड, रवींद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : भाग्यनगर रस्त्यावर आयआयबी क्लासेससमोरील अभ्युदय बँकेजवळ एका १८ वर्षीय विद्यार्थिनीवर तरुणाने खंजरने हल्ला केल्याची घटना सोमवार, ५ ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. या हल्ल्यात दीक्षा भगत (दिपनगर) ही विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शिवाजी पोहरे हा दीक्षा भगतला ओळखत होता. ‘तू मला आवडतेस, आपण लग्न करू,’ असे त्याने दीक्षाला सांगितले होते. मात्र, दीक्षाने त्याला नकार दिला. याच कारणातून सोमवारी दुपारी आयआयबी क्लासेससमोरील रस्त्यावर अभ्युदय बँकेजवळ रोहितने दीक्षावर खंजरने हल्ला केला. त्याने तिच्यावर तीन वार केल्याने ती गंभीर जखमी होऊन रस्त्यावर पडली.
घटनेची माहिती मिळताच भाग्यनगरचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संकेत सवराते हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी दीक्षाला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, या प्रकरणी रोहित पोहरे याच्याविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा कोचिंग क्लासेसच्या परिसरात विद्यार्थिनीवर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


