अमरावती, राज माहोरे(प्रतिनिधी) : राज्यातील न्यायव्यवस्थेला हादरविणारी धक्कादायक घटना सोमवारी समोर आली. अमरावतीसह ठाणे, सातारा, सोलापूर, सांगली, बीड, हिंगोली आणि परभणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयांना एकाच वेळी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे ई-मेल प्राप्त झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर संबंधित न्यायालयांमध्ये तातडीने सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून न्यायालयीन इमारती रिकाम्या करून तपासणी सुरू करण्यात आली आहे.
अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाला दुपारी १२ वाजताच्या सुमारास धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. या ई-मेलमध्ये दुपारी ३ वाजता न्यायालयाची इमारत बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ई-मेल प्राप्त होताच न्यायालय प्रशासनाने तातडीने सुरक्षा यंत्रणांना माहिती दिली. खबरदारीचा उपाय म्हणून न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी, विविध कामांसाठी आलेले पक्षकार आणि नागरिकांना इमारतीबाहेर काढण्यात आले.
अचानक न्यायालय परिसर रिकामा करण्याची सूचना मिळाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. न्यायालयाच्या दोन्ही इमारतींसह संपूर्ण परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकारी, बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS), श्वान पथक आणि कमांडो पथक घटनास्थळी दाखल झाले. न्यायालयातील प्रत्येक दालन, न्यायाधीशांचे कक्ष, कार्यालये आणि परिसराची कसून तपासणी सुरू करण्यात आली.
दरम्यान, राज्यातील इतर जिल्हा न्यायालयांनाही अशाच स्वरूपाचे धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती समोर आली. सातारा, बीड आणि सोलापूर येथील न्यायालय परिसरातही पोलिसांनी तातडीने धाव घेत सुरक्षा व्यवस्था कडक केली. हिंगोली येथे न्यायाधीशांच्या कक्षासह विविध दालनांची तपासणी करण्यात आली. सांगली आणि परभणी येथेही डॉग स्क्वॉड व बॉम्ब शोधक पथकाच्या माध्यमातून तपासणी सुरू करण्यात आली.
या धमकीच्या ई-मेलमध्ये काही संघटनांची नावे नमूद असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे तपास यंत्रणांकडून या बाबीचीही पडताळणी केली जात आहे. एकाच वेळी अनेक जिल्ह्यांतील न्यायालयांना धमकीचे ई-मेल पाठविण्यामागे नेमका कोणाचा हात आहे, ई-मेल कुठून पाठविण्यात आले आणि त्यामागे कोणता उद्देश आहे, याचा शोध घेण्यासाठी सायबर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.
प्राथमिक स्तरावर हा खोडसाळपणाचा प्रकार आहे की यामागे काही गंभीर कट आहे, या दोन्ही शक्यतांचा विचार करून पोलीस तपास करीत आहेत. न्यायालयासारख्या अतिसंवेदनशील ठिकाणांना एकाच वेळी लक्ष्य करण्यात आल्याने सुरक्षा यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, तपासणी पूर्ण होईपर्यंत न्यायालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


