नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : शहरातील अबचलनगर ते यात्री निवास पोलीस चौकी या जोडरस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या हस्ते नारळ फोडून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या रस्ता दुरुस्तीच्या मागणीला अखेर यश आले आहे.
मलनिस्सारण वाहिनीच्या कामासाठी मे महिन्यात हा रस्ता खोदण्यात आला होता. त्यानंतर रस्ता उखडलेल्या अवस्थेतच राहिल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. पावसाळ्यात रस्त्यावर घसरगुंडी निर्माण होऊन अनेक छोटे-मोठे अपघात झाले होते. त्यातच रस्त्यावर गिट्टी टाकण्यात आल्याने दुचाकींसह अन्य वाहनांच्या वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत होते. अनेकदा मोठी वाहनेही या रस्त्यावर अडकून पडली होती.
या परिस्थितीमुळे परिसरातील शीख बांधवांसह नागरिकांनी रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी या विषयात लक्ष घातले. तसेच संबंधित विभाग आणि कंत्राटदाराला रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार अखेर कामाला सुरुवात झाली आहे.
यावेळी आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या हस्ते नारळ फोडून कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे, नगरसेवक गुरमीतसिंघ (डिंपल) नवाब, नगरसेवक धीरज यादव, शिवसेना सहसंपर्कप्रमुख दर्शनसिंग सिद्धू, सहसंपर्कप्रमुख गुरमीतसिंघ टमाना, उपजिल्हाप्रमुख अवतारसिंग पहिरेदार, गुरमीतसिंग महाजन, रोशनसिंग जहागीरदार, मनप्रीतसिंग कुंजीवाले, महेंद्रसिंग लांगरी, तेजपालसिंघ खेड, गुरुदीपसिंघ संधू, नानकसिंग फौजी, सुदिन पाटील बागल, रवी थोरात, इंदरसिंघ सरदार, जीतसिंघ दुकानदार यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.


