मा.ना. उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, आम्हा ज्येष्ठांची दिवाळी गोड कधी करणार?

ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित घोषणांची अंमलबजावणी करा; डॉ. हंसराज वैद्य यांचा सवाल

नांदेड, (प्रतिनिधी) : ‘बहिण-भावांची दिवाळी गोड, मग आम्हा जन्मदात्या ज्येष्ठ नागरिक मायबापांची दिवाळी मात्र उपासाचीच का?’ असा परखड सवाल उपस्थित करत महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांचीही दिवाळी यंदा गोड करावी, अशी मागणी उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्कॉम, नांदेडचे अध्यक्ष तथा सहयोग ज्येष्ठ नागरिक संघाचे नेते डॉ. हंसराज वैद्य यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे लक्ष त्यांनी राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे वेधले आहे.

राज्यातील माता-भगिनींसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यांचे स्वागतच आहे. मात्र, आयुष्याची अनेक वर्षे कुटुंब, समाज आणि राज्याच्या उभारणीसाठी खर्ची घालणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मायबापांच्या वाट्याला आजही उपेक्षाच येत आहे. बहिणींसाठी योजना, भावांसाठी विविध सवलती आणि घोषणांची खैरात होत असताना ज्येष्ठ नागरिकांना मात्र आपल्या हक्काच्या मदतीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. मग ज्येष्ठ नागरिक मायबापांनीच काय पाप केले आहे? त्यांना शासनाच्या कल्याणकारी योजनांपासून वंचित का ठेवले जात आहे, असा सवाल डॉ. वैद्य यांनी उपस्थित केला.

सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळाचे अस्मानी संकट उभे ठाकले आहे. महागाई, औषधोपचारांचा वाढता खर्च, आरोग्याच्या समस्या आणि उत्पन्नाचे मर्यादित साधन यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे जगणे अधिकच कठीण झाले आहे. विशेषतः निराधार, एकटे राहणारे आणि मुलांपासून विभक्त असलेल्या वृद्धांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत सणासुदीच्या काळात त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याची जबाबदारी शासनाने स्वीकारली पाहिजे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक मदत, सन्मानजनक मासिक अर्थसाहाय्य, आरोग्य सुविधा आणि विविध शासकीय सवलतींबाबत केवळ घोषणा न करता त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिक अनेक दिवसांपासून शासनाच्या आश्वासनांकडे डोळे लावून बसले आहेत. त्यांच्या अपेक्षांना न्याय देण्याची हीच योग्य वेळ आहे. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी नांदेड दौऱ्यादरम्यान ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांची दखल घ्यावी, त्यांच्यासाठी ठोस निर्णय जाहीर करावेत आणि यंदाची दिवाळी त्यांच्या जीवनातही आनंदाची पहाट घेऊन यावी, असे आवाहन डॉ. हंसराज वैद्य यांनी केले आहे.

‘ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे ओझे नाहीत, तर समाजाचा अनुभवसंपन्न ठेवा आहेत. ते राष्ट्रीय संपत्ती आहेत. ज्येष्ठत्व हा गुन्हा नसून नैसर्गिक तथा संवैधानिक भूषण आहे. त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्यांना सन्मानाने जगता यावे, एवढी तरी संवेदनशीलता शासनाने दाखवावी. इतरांची दिवाळी गोड करताना ज्येष्ठांच्या आयुष्यातील अंधार दूर करण्याचेही भान शासनाने ठेवावे,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अमरनगर ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे वाढदिवसाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

नागपूर, उज्वल रोकडे (प्रतिनिधी) : अमरनगर ज्येष्ठ नागरिक मंडळ, अमरनगर यांच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष देविदासजी आगरकर आणि ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान, नागपूरचे सचिव राजूजी मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिकांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम…

शरीर आणि मनाचे संतुलन बिघडल्यास आयुष्यात अशांतता : शकुंतला दिदी

पुणे, राजन शेळके (प्रतिनिधी) : शरीर आणि मनाचे संतुलन राखल्यास दीर्घायुष्य प्राप्त होते. मात्र, हे संतुलन बिघडल्यास आयुष्यात अशांतता निर्माण होऊन अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शरीर, मन आणि आत्म्याचे…