अहिल्यानगर, राधेश्याम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख) : श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथे अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) व विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल, विळद घाट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
अनुलोम मित्र संग्रामजी शिंदे तसेच भाजपा महिला आघाडी अध्यक्षा देवयानीताई संग्राम शिंदे यांच्या पुढाकाराने हे शिबिर आयोजित करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये डॉ. सागर देवकर व त्यांचे सहकारी राजेंद्र धोत्रे यांनी नागरिकांची नेत्र तपासणी केली. यावेळी एकूण १२० नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान ३५ नागरिकांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले. संबंधित नागरिकांना पुढील उपचार व आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले.
या आरोग्य शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत नेत्र तपासणीची सुविधा मिळाली. नागरिकांनी या उपक्रमाबद्दल अनुलोम व विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलचे आभार मानले. ‘सेवा परमो धर्म’ या भावनेतून अनुलोमच्या माध्यमातून समाजहिताचे विविध आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.


